छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ दोन मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिल्याचे सांगत मजलिस – ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एमआयएम पक्षाने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बुऱ्हाणपूर आणि जबलपूर या दोन मतदारसंघात उमेदवारांची नावे नक्की केली आहेत. २३० जागा असताना आणि अनेक ठिकाणी उमेदवार निवडून येण्या इतपत मुस्लिम मतदारांचा प्रभाव असतानाही काँग्रेसची ही वागणूक न पटल्याने शेवटच्या क्षणी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एमआयएमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार इत्मियाज जलील यांनी दिली.
खरे तर मध्य प्रदेशात निवडणूक लढणार नाही, असे पूर्वी एमआयएमकडून सांगण्यात आले होते. मात्र, काँग्रेसने केवळ दोन उमेदवार देऊन मुस्लिम नेत्यांची बोळवण केली. त्यामुळे काही जणांनी ‘एमआयएम’ ने निवडणूक लढवावी अशी मागणी केली. बुऱ्हाणपूर मतदारसंघात मुस्लिम मतदारांचे निर्णयाक मतदान आहे. त्यामुळे येथून निवडणूक लढवावी या मागणीवर आधी हैदराबाद येथे चर्चा झाली. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन मतदारसंघातील सभांच्या आधारे मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा कडवा हिंदू- मुस्लिम प्रचार होण्याची शक्यता आहे. आम्ही दोनच जागा लढविणार असल्याने त्याचा राज्याच्या विधानसभेमध्ये कोणताही फरक पडणार नाही. पण काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेचे तत्वज्ञान अजून ऐकून घेता येणे शक्य नाही, म्हणून मध्य प्रदेश निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – तेलंगणा: अभिनेते पवन कल्याण यांचा प्रभाव भाजपाला तारणार का? जेएसपीसह युतीची शक्यता
तेलंगणामध्ये हैदराबादमधील पाच जागा लढण्याचे ठरलेले होते. राज्यात अन्यत्र किती ठिकाणी उमेदवार द्यायचे याबाबतची चर्चा सुरू आहे. त्यावर अद्यापि निर्णय झालेला नाही. मात्र, मध्य प्रदेशातील दोन जागांसह आणखी काही ठिकाणी उमेदवार देता येतात का, याची चाचपणी सुरू असल्याचे खासदार जलील यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.