संतोष प्रधान
पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी एमआयएमने केलेली राज्याची निवड तसेच राज्यात पक्ष बांधणीसाठी देण्यात आलेले लक्ष यावरून एमआयएमची ताकद राज्यात वाढणार का आणि तशी ताकद वाढल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार का, असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
एमआयएमचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मुंबई व नवी मुंबईत होत आहे. या निमित्ताने पक्षाच्या वतीने मुंब्रा आणि मालाड मालवणी येथे दोन जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंब्रा व मालवणी हे दोन्ही मुस्लीमबहुल भाग म्हणून ओळखले जातात. या दोन्ही ठिकाणी जाहीस सभांचे आयोजन करून मुस्लिमांमध्ये पक्ष अधिक लोकप्रिय करण्यावर एमआयएमने भर दिला आहे. मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड तर मालवणीमध्ये काँग्रेसचे आस्लम शेख हे आमदार आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याचा एमआयएमचा प्रयत्न दिसतो.
हेही वाचा… राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपचे बळ
महाराष्ट्रात पक्ष वाढविणे हे एमआयएमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. सध्या जलील हे स्वत: औरंगाबाद मतदारसंघदाचे खासदार आहेत. याशिवाय मालेगाव आणि धुळे या दोन शहरांमध्ये एमआयएमचे आमदार आहेत. एक खासदार, दोन आमदार यासह विविध महापालिकांमध्ये या पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते. तेलंगणातील हैदराबादमध्ये मूळ असलेल्या या पक्षाने राज्यात नांदेडमध्ये प्रवेश करून प्रस्थापितांचे लक्ष वेधून घेतले होते. मुस्लीमबहुल भागात एमआयएमने काही ठिकाणी बऱ्यापैकी बस्तान बसविले. अबू आसीम आझमी यांच्यामुळे अल्पसंख्यांकामध्ये समाजवादी पक्षाचे चांगले संघटन आहे. समाजवादी पार्टीचे दोन आमदार आहेत. आता एमआयएम ताकदीने उतरत आहे.
हेही वाचा… दुभंगलेल्या काँग्रेसमध्ये सत्कारानिमित्त एकीचे बळ
एमआयएम अधिक ताकदावान होणे हे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. कारण राज्चात अल्पसंख्याक वर्ग मुख्यत्वे काँग्रेसला साथ देत आला आहे. अल्पसंख्यांक मतांचे होणारे विभाजन हे भाजपच्या पथ्थ्यावरच पडते. राज्यातील मुस्लीम वर्ग राजकीयदृष्ट्या परिपक्व आहे. कोणाला मते दिल्याने होणाऱ्या परिणामांची त्यांना चांगली जाण आहे. यामुळे धर्मनिरपेक्ष विचारांची मते ही काँग्रेस आघाडीलाच मिळतील, असा दावा काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली. मात्र, अल्पसंख्यांक तसेच बहुसंख्यांक समाजाला आता एमआयएमबद्दल आकर्षण वाटत आहे. मुस्लीम, दलित सारेच समाज घटक एमआयएमच्या पाठीशी उभे राहतील, असे एमआयएमचे खासदार जलील यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा… राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी भाजपची अशीही युक्ती
एमआयएममुळे होणारे मतांचे धुव्रीकरण हे महाविकास आघाडीलाही त्रासदायक ठरू शकते. एमआयएमचे खासदार ओवेसी यांचा राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांवर कितपत प्रभाव पडतो यावर सारी गणिते अवलंबून असतील.