मुंबई : सर्व राजकीय पक्षांना आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असतो. यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व २८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण करून त्यानुसार महायुतीत किती मतदारसंघांवर दावा करायचा याचा निर्णय घेतला जाईल. पक्षाने गेल्या वेळी जिंकलेल्या ५४ जागा पक्षाच्या हक्काच्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व जागांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यात पक्षाची ताकद कुठे चांगली आहे याचा अंदाज येईल. काही जागा सध्या आमच्या ताब्यात नसल्या तरी तेथे निवडून येऊ शकतो. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज येईल. त्यानंतरच महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादीच्या वतीने जागांवर दावा केला जाईल. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ आहे. भाजप नेत्यांशी चर्चा केली जाईल. महायुतीला पुन्हा सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्री कोण असेल, यावर विधानसभा निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहोत. भविष्यातील निर्णय हा भाजपचे नेते घेतील, असे पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा… कारण राजकारण: राज-शिंदे जवळीक राजू यांना तारक?
लोकसभा निवडणुकीत माढा आणि नगर या दोन्ही जागा आम्ही मागितल्या होत्या. या जागा आम्हाला मिळाल्या असत्या तर दोन्ही मतदारसंघांत महायुतीचे खासदार निवडून आले असते, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप आणि राष्ट्रवादीत मते परस्परांमध्ये हस्तांतरित होत नाहीत हा आरोप चुकीचा आहे. रायगड मतदारसंघात भाजपची मते आम्हाला मिळाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.