छत्रपती संभाजीनगर : राख, वाळू, भूमाफिया तसेच विविध प्रकारच्या गैरव्यवहारांमुळे चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून अपयशी ठरू नये म्हणून बैठकांमध्ये आणि भाषणांमध्ये अजित पवार आक्रमक झाल्याचे दिसून आले. सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर आणि भाजपशी मैत्री केल्यानंतर अजित पवार नव्या प्रतिमेच्या शोधात आहेत. आपल्या वक्तशीरपणातून तसेच थेट सूचना देण्याच्या पद्धतीमुळे प्रशासनावर पकड असणाऱ्या अजित पवार यांना मराठवाड्यात धनंजय मुंडे यांच्या बदनाम प्रतिमेपासून स्वत: वेगळे ठेवायचे आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या पुनर्मांडणी प्रयोगही बीडमध्ये सुरू केल्याचे मानले जात आहे.

बीड जिल्ह्यात अजित पवार गटाचे तीन आमदार आहेत.

परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे छायाचित्र आजही समाजमाध्यमातून मिरवले जाते. अशा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांला अजित पवार यांनी बुधवारी सुनावले. राख, वाळू, भूमाफिया यांनी या मतदारसंघात कहर केला आहे, याची जाणीव असल्याने अजित पवार यांनी या सर्वांना सुतासारखे सरळ करू असे म्हटले. पण प्रत्यक्षात कशी कारवाई होते, यावर सारे अवलंबून असणार आहे. मात्र, परळी औष्णिक वीज केंद्राच्या बाहेरच्या बाजूस कोणाच्या शेतात किती राख पडून आहे, याची यादी प्रशासनाकडे आहे की नाही, याचा आढावा झालेला नाही.

विधिमंडळात या अनुषंगाने राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर हे अवैध साठे जप्त केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. पण ही कारवाई पालकमंत्री म्हणून अजित पवार किती लवकर करुन घेतात, यावर त्याचे प्रशासकीय कौशल्य जोखले जाण्याची शक्यता आहे. वाळू, भूमाफिया यांच्यावरील कारवाईचे प्रमाण वाढले आणि त्याची चर्चा सुरू झाली तर अजित पवार यांच्या प्रतिमा उजळणार आहे. त्यामुळेच त्यांनी राख, वाळू, भूमाफिया असे तिन्ही शब्दप्रयोग एकत्रित उच्चारत प्रशासन आणि कार्यकर्ते दोन्ही स्तरावर इशारे देणारे भाषण केले, असे मानले जात आहे.

पालकमंत्री अजित पवार यांच्या दुसऱ्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर असल्याने राष्ट्रवादीच्या अन्य दोन आमदारांसह राष्ट्रवादीची नवी बांधणी करत बीड सुधारण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. याच मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचीही ताकद आहे. खासदार बजरंग सोनवणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे असणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती अजित पवार यांच्याकडे असल्याने पक्षीय पुनर्मांडणीमध्ये ते नव्या कार्यकर्त्यांचाही शोध घेत असल्याचे सांगण्यात येते.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बीडची राष्ट्रवादी कॉग्रेसची बरखास्त केलेली कार्यकारिणी अद्यापि निवडलेली नाही. जिल्हाध्यक्ष कायम असले तरी बाकी सदस्य नसल्याने पक्षीय पुनर्रचना कशी असेल, हेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. राजकीय प्रतिमेस तडा जाणार नाही, याची काळजी अजित पवार घेत असल्याचे बीडमधील दुसऱ्या बैठकीनंतर दिसून आले. पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिमा मराठवाड्यात निर्माण करताना अजित पवार कंत्राटदार कार्यकर्त्यांच्या गरड्यातून स्वत:ला सोडवू पाहत आहेत, असा संदेश त्यांनी दिला आहे. १० लाखापेक्षा अधिकची सर्व कामे आता ई – निविदेच्या आधारेच केली जातील, असेही त्यांनी सांगितल्याने अजित पवार बीडमध्ये आणि राज्याच्या राजकारणातही नव प्रतिमेच्या शोधात असल्याचे चित्र दिसून येत आहे.