बाकी काहीही म्हणा दादा, पण एखादी गोष्ट दीर्घकाळ मनात ठेवून ती योग्य संधी मिळताच सार्वजनिक करण्याच्या तुमच्यातील गुणाला दाद द्यायला हवी. तसे तुमचे व देवाभाऊंचे गूळपीठ जुने. पाच वर्षांपूर्वीचे. तेव्हाच तुम्हाला आबा ऊर्फ आर.आर. यांनी केसाने गळा कापल्याचे ठाऊक झाले असणार, पण तुम्ही तासगावला जाईपर्यंत हे गुपित मनात ठेवले. पण काय हो दादा, आबांनी तेव्हा खुल्या चौकशीचे आदेश देऊन विरोधी पक्षनेते देवाभाऊंचा मान राखला व लोकशाहीपूरक भूमिका घेतली असे वाटत नाही का तुम्हाला? भलेही तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांनी ही गोष्ट आता नाकारली असली तरी! जरा विचार करा की यावर. आणि आताच तुम्ही हे वक्तव्य का केले? राष्ट्रवादीचा खरा ‘चेहरा’ आबाच असेे थोरले साहेब सतत म्हणायचे त्याचा राग मनात होता म्हणून की आबापुत्र तुमच्याबरोबर आले नाहीत म्हणून? समजा या प्रकरणाची चौकशी सुरूच झाली नसती, एसीबीच्या चौकशीत ईडीने हातच टाकला नसता तर तुम्ही भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. म्हणजे आज तुम्ही थोरल्या पवारांसोबतच राहिले असते. सत्तेच्या बाहेर. हे तुम्हाला मान्य झाले असते का? की भाजपसोबत जाण्याचा आणखी काही बहाणा तुम्ही शोधला असता? त्या चौकशीमुळेच देवाभाऊंनी तुम्हाला ‘वश’ केले. म्हणून खरे तुम्ही आबांचे आभार मानायला हवेत. बरोबर ना! तुम्ही भाजपसोबत गेले नसते तर ‘क्लिनचिट’सुद्धा मिळाली नसती. म्हणजे आरोपाचे भूत मानगुटीवर कायम राहिले असते. त्यापेक्षा जे झाले ते बरेच की! त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा तासगावला जा व आबांनी चौकशी लावल्यामुळेच मी पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकलो असे सांगून त्यांचे जाहीर आभार माना. दिवंगताला नाहक यात भोवले असे समाधान तरी तुम्हाला लाभेल.

श्री.फ.टाके