संतोष प्रधान
पालकमंत्रीपदाच्या वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनासारखे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले असले तरी छगन भुजबळ व सुनील तटकरे यांची इच्छापूर्ती मात्र झालेली नाही. राष्ट्रवादीच्या नऊपैकी सात मंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची मागणी मान्य झाली. याशिवाय राष्ट्रवादीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ आणि आदिती तटकरे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आलेले नाही. छगन भुजबळ यांचा डोळा नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आहे.नाशिकचे पालकमंत्री शिंदे गटाचे दादा भुसे आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपली कन्या आदिती यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही होते. पण रायगडमधील शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांनी आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपविण्यास विरोध दर्शविला होता.

हेही वाचा >>> बिहारनंतर आता कर्नाटक सरकारही जातीआधारित सर्व्हे प्रकाशित करण्याच्या तयारीत

राष्ट्रवादीला पुणे, कोल्हापूर, बीड, गोंदिया, परभणी या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या दोन जागा अजित पवार गटाच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांच्याकडून काढून हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आले. हा शिंदे गटाला मोठा धक्का समजला जातो. कारण कोल्हापूरचे खासदारपद शिंदे गटाकडे आहे. हसन मुश्रीफ पालकमंत्री झाल्याने जिल्ह्यातील निधी वाटपावर त्यांचे वर्चस्व राहणार आहे. बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे आल्याने पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. सत्तेच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे पंकजा समर्थकांना आपल्याकडे ‌वळविण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत.

हेही वाचा >>> कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाल्याने हसन मुश्रीफ यांचे स्वप्न अखेर साकार 

खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी रायगडचे पालकमंत्रीपद महत्त्वाचे आहे. यामुळेच कन्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळावे, असा त्यांचा प्रयत्न असेल. नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे असल्याने महायुतीत नाशिकचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला हवे आहे. पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा अजित पवार गट आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar allotment of guardianship chagan bhujbal sunil tatkare wishes are not fulfilled print politics news ysh