पुणे : लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तयारीचे रणशिंग बारामतीतूनच फुंकणार आहेत. येत्या रविवारी (१४ जुलै) ‘राष्ट्रवादी जनसन्मान महामेळावा’ बारामतीला होत असून, त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे राज्यभरातील प्रमुख नेते बारामतीमध्ये ठाण मांडणार आहेत. या मेळाव्यात बारामतीवर कब्जा राखण्यासाठी नियोजनाबरोबच प्रचाराची रंगीत तालीम करताना अजित पवार हे कोणावर तोफ डागणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामतीमधून झालेला विजय हा अजित पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. सुळे यांच्या विजयानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्याच्या राजकारणबरोबरच पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी बारामतीसह जिल्ह्याचा दौरा केला. त्यामध्ये बारामतीमध्ये त्यांनी सलग तीन दिवस बैठका आणि सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. या काळात अजित पवार हे बारामतीपासून दूर होते. दर रविवारी बारामतीत होणारा त्यांचा दरबारही भरला नाही. आता मतदारांशी पुन्हा एकदा संपर्क साधण्यासाठी ‘जनसन्मान महामेळावा’ बारामतीत घेण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेत अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोणाला लक्ष्य करणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. या महामेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्याद्वारे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे ही वाचा… तारीख ठरली! प्रशांत किशोर स्थापणार नवा राजकीय पक्ष; दलित-मुस्लिमांना विशेष आवाहन

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी प्रचाराची पूर्वतयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेतला आहे. आता प्रचाराच्या पूर्वतयारीच्या दुसऱ्या टप्प्यात बारामतीमध्ये जनसन्मान महामेळावा आणि जाहीर सभा घेऊन सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा… उत्तर प्रदेशमधील दलितांची गमावलेली मते पुन्हा मिळवण्यासाठी भाजपाने कशी आखली आहे रणनीती?

अजित पवारांचे बारामतीवर लक्ष

या महामेळावा आणि जाहीर सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार असले, तरी बारामती तालुका आणि शहरातील मतदारांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यावरून अजित पवार यांनी बारामतीकडे विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. युगेंद्र पवार यांनीही मतदारांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. बारामती विधानसभा मतदार संघात अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना उभे केल्यास लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये चुरसीची लढत होऊ शकते. त्यामुळे अजित पवार यांनीही बारामतीकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यादृष्टीने महामेळावा आणि जाहीर सभेत बारामती विधानसभा मतदार संघातील मतदार जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar attempting to retain baramati assembly constituency print politics news asj
Show comments