लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे/ बारामती : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. कोणत्याही सरकारला आपल्या काळात अशी घटना घडावी, असे वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. त्याबाबत राज्यातील जनतेची माफीही मागितली. मात्र, विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन केले. आमच्या छायाचित्रांना जोडे काय मारता, हिंमत असेल तर, समोर येऊन दोन हात करा,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथे जन सन्मान यात्रेत अजित पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवा नेते पार्थ आणि जय पवार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, की या घटनेत राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच दैवत आहेत. या प्रकरणात ज्यांची चूक झाली त्याला शोधून काढले जाईल. मात्र त्याचे कोणीही राजकारण करू नये.

हेही वाचा >>>RSS चे जातनिहाय जनगणनेला समर्थनाचे संकेत, पण…

महापुरुषांचा चांगल्या पद्धतीने उभा केलेला पुतळा कोसळावा, असे कोणालाही वाटणार नाही. मात्र, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण आणले जात आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. अशा घटना महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाहीत. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यघटना बदलणार, आरक्षण हटविणार असा अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे त्या संबंधित समाज नाराज झाला, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar challenges the opposition regarding the chhatrapati shivaji maharaj statue accident movement print politics news amy