सीताराम चांडे
शिर्डी : शिबिर ‘विचार मंथन’, संकटात सापडलेल्या शेतकरी, कष्टकरी यांना आधार देण्यासाठी, मात्र शिबिरासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या आलिशान गाड्या, सोबतचा लवाजमा, त्यांचे महागडे मोबाईल, एखाद्याचे प्रदर्शन करणारे सोन्याचे दागिने पाहून अस्वस्थ झालेल्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या रागाचा फटका या अशा कार्यकर्त्यांना बसला. अंगभर दागिने घालून आलेल्या एका कार्यकर्त्याला तर त्यांनी सर्वांसमक्षच चांगलेच फैलावर घेतले.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे शिबिर शुक्रवारपासून शिर्डीतील ‘साई पालखी निवारा’ येथे सुरू झाले आहे. हे शिबिर ‘विचार मंथन’, संकटात सापडलेल्या शेतकरी, कष्टकरी यांना आधार देण्यासाठी, राज्यापुढील आव्हानांचा वेध घेण्यासाठी असे जाहीर केलेले आहे. मात्र सकाळपासून येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वावर हा एखाद्या उंची सोहळ्यासारखा होता. आलिशान गाड्या, सोबतचा लवाजमा, महागडे मोबाईल, अंगावरचे प्रदर्शन करणारे दागिने काही कार्यकर्ते मिरवत होते.
हेही वाचा… अजित पवारांनी बारामतीसाठी मंजूर केलेल्या २४५ कोटींच्या विकासकामांना चंद्राकांत पाटील यांची कात्री
विरोधी पक्ष नेते अजित पवार हे या प्रकाराने अस्वस्थ दिसत होते. अशातच त्यांच्या पुढ्यात असाच एक पदाधिकारी या श्रीमंतीचे प्रदर्शन करत आला. उंची सूट, गळ्यात भरगच्च सोन्याच्या साखळ्या, सर्व बोटांत सोन्याच्या अंगठ्या हे सर्व पाहून अजितदादांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. आपल्या शैलीत राग व्यक्त करत फटकारले, ‘अरे बास, अजून किती सोने घालायचे बाकी ठेवणार आहेस. तू तर पार आपली अब्रूच काढलीस!’, असे अजित पवार यांनी त्याला सुनावले. या फटकाऱ्याने कार्यकर्ता तर खजील झालाच, पण आजूबाजूचे पदाधिकारीदेखील सावध झाले.
हेही वाचा… विद्यापीठ निवडणुकीत राज्य सत्ताकारणातील प्रयोगाच्या हालचाली
सुमारे सहा महिन्यांपूर्वी, जूनच्या पहिल्या आठवड्यात शिर्डीमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर झाले होते. हे चिंतन शिबिर ज्या ‘साई पालखी निवारा’ स्थळी झाले, तेथेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे हे ‘विचार मंथन’ शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरार्थीसाठी राष्ट्रवादीने आलिशान मंडप टाकला आहे. खाली लाल गालिचा पसरला आहे. त्यामुळे पंचतारांकित व्यवस्थेचा भास पदाधिकाऱ्यांना जाणवत आहे. पक्षाच्या ‘व्हीआयपी’ पदाधिकाऱ्यांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे, तर इतर पदाधिकाऱ्यांसाठी हॉटेलमधील खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
शिबिरार्थींच्या भोजनाची व्यवस्था नाशिकस्थित एका खासगी व्यावसायिकाकडे देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी, शुक्रवारी कार्तिकी एकादशी असल्याने शुद्ध शाकाहारी जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता. त्यामध्ये ज्वारीची भाकरी, वांग्याचे भरीत, कुरडया, पापड, कोल्हापुरी तडका, पनीर, पुरी, चपाती, फ्राइड राईस, दाल तडका, लेमन कोरिएंडर सूप, गाजर हलवा, गुलाबजाम या पदार्थांचा समावेश होता. त्याचा आस्वाद शिबिरार्थींनी मनापासून घेतला.