नवी दिल्ली : राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये होत असलेल्या कोंडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अचानक आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. महायुतीमधील मुख्यमंत्रीपद तीनही घटक पक्षांना आलटून-पालटून दिले पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार प्रफुल पटेल यांनी या मागणीचे खंडन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. शहांनी विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहांनी घेतलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच प्रफुल पटेल यांच्यासह भाजप व शिंदे गटाचे इतरही नेते उपस्थित होते. महायुतीतील नेत्यांशी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर शहांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशीही स्वतंत्रपणे चर्चा केल्याचे समजते. शहांनी झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपद फिरते असले पाहिजे अशी अट घातल्याचे सांगितले जाते. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले तर प्रत्येक घटक पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी शहांकडे मांडल्याचे समजते.

हेही वाचा >>>गंगाजल-गोमूत्र प्राशन करायला लावून काँग्रेस नगरसेवकांचं शुद्धीकरण? महापौर म्हणाल्या, “आता ते भ्रष्टाचारमुक्त झाले”

समन्वयावर भर

अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मागणीचा मुद्दा फेटाळला. ‘शहांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. हा मुद्दादेखील उपस्थित झाला नाही’, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. ‘महायुतीतील तीनही घटक पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असून एकमेकांमधील समन्वय वाढवण्यावर चर्चेत अधिक भर देण्यात आला होता’, असेही पटेल यांनी सांगितले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर भाजपचे संसदीय मंडळ हे ठरवेल असे त्यांनी नमूद केले, मात्र फिरते मुख्यमंत्रीपद शक्य नसल्याचे सांगितले.

गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर सभा तसेच प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्येही अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची मनीषा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असूनही त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले आहे. शिवाय, अलीकडच्या काळात ‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय घेण्यावरून तसेच मंत्रिमंडळातील निर्णयांवरूनही शिंदे गट-भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मतभेद तीव्र होऊ लागल्याचे सांगितले जाते. अजित पवार गटाने ६० पेक्षा जास्त जागांची मागणी केली असली तरी त्याबाबतही तडजोड करावी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. अशा अनेक कारणांमुळे अजित पवार गटाची महायुतीमध्ये कोंडी होत असल्यानेच या गटाने आक्रमक होत फिरत्या मुख्यमंत्रीपदाची मागणी शहांकडे केल्याचे मानले जात आहे.

चर्चा अंतिम टप्प्यात

महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली असून भाजपला १५५-१६०, शिंदे गटाला ८०-८५ व अजित पवार गटाला ५०-५५ जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.

जागावाटपामध्ये कोणत्याही पक्षाचे नुकसान होणार नाही. महायुतीमध्ये जागांचे योग्य वाटप केले जाईल. – प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते