पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर बिहारप्रमाणेच मुख्यमंत्रिपद ठरविण्याबाबत कोणतीही चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झाली नाही. ती अफवा आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी या शक्यतेचे खंडन केले. मुख्यमंत्रिपदाबाबत नाही, तर सोयाबीन, कापूस, कांदा निर्यातबंदीसह अन्य काही गोष्टींबाबत शहा यांच्याबरोबर चर्चा केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना अजित पवार आणि शहा यांची भेट झाली होती. या भेटीवेळी बिहार पॅटर्ननुसार विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव पवार यांनी शहा यांना दिल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या शक्यतेचे खंडन केले. तसेच राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील, हा दावाही त्यांनी फेटाळला.
ते म्हणाले की, महायुतीच्या सर्व घटक पक्षांना फायदा होण्याचा विचार आम्ही करत आहोत. सर्व पक्ष एकत्र बसून विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करण्यात येईल. बहुतांश जागांचे वाटप निश्चित झाले आहे. उर्वरित जागा वाटपाचा निर्णयही येत्या काही दिवसांत होईल. मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव, काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती या सर्व अफवा आहेत. जागा वाटप निश्चित झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल.
हेही वाचा >>> भाजप निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दानवे
अजित पवार यांना महायुतीपासून तात्पुरते वेगळे होऊन स्वतंत्र निवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. यासंदर्भात पवार यांच्याकडे विचारणा केली असता, ‘त्याबाबत त्यांना विचारणे योग्य राहील. इतरांनी केलेल्या विधानांवर मी बोलणार नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्रिपद मागण्यासारखी अजित पवारांची स्थिती नाही जयंत पाटील
नागपूर : अजित पवार यांच्या पक्षाची स्थिती मुख्यमंत्रीपद मागण्यासारखी नाही. निवडणुकीपूर्वी ते अशी मागणी करणार नाहीत, असे मिश्कील भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते मंगळवारी नागपुरात बोलत होते. शिव स्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा मंगळवारपासून विदर्भातून सुरू झाला. त्यासाठी नागपुरात आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे लक्ष एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीकडे वेधले असता जयंत पाटील म्हणाले, मला वाटत नाही अजितदादा अशी मागणी करतील. त्यांनी मुख्यमंत्रीपद मागण्यासारखी स्थिती नाही. निवडणुकीपूर्वी ते अशी मागणी करणार नाहीत. भाजप सध्या सर्वात मोठा पक्ष आहे. तिथे मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदार आहेत. त्यामुळे ते अजित पवारांना मुख्यमंत्री करतील असे वाटत नाही. अजित पवार हे अरोरा नावाच्या ‘कन्सल्टंट’चेच ऐकतात. ते सांगतील तेवढेच बोलतात. अजित पवारांना त्यांचा मूळ स्वभाव समोर आणण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ते आता आधीसारखे राहिले नाहीत. अजित पवार हे आता सहानुभूती दाखवण्याचा, मागे झालेल्या चुका दुरुस्त करत असल्याचा देखावा करत आहेत. अरोराने अजितदादांमध्ये परिवर्तन घडवले आहे, असेही ते म्हणाले.