नांदेड : जिल्ह्याच्या राजकारणात दादा हे संबोधन लागलेले ज्येष्ठ नेते व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट देत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याचा ‘वादा’ घेत आपल्या नांदेड-परभणीच्या राजकीय दौऱ्याची सांगता केली. खतगावकरांचा नवा पक्षप्रवेश आता लवकरच होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी दिवसभर नांदेड जिल्ह्यामध्ये आणि सायंकाळी परभणीत वेगवेगळ्या कार्यक्रमांस उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार रात्री उशिरा नांदेडमध्ये थेट खतगावकर यांच्या निवासस्थानी धडकले. माजी मंत्री नवाब मलिकही त्यांच्यासमवेत होते. खतगावकर, त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा प्रभृतींनी ‘राष्ट्रवादी’मध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू केली होतीच; पण पवारांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले.

पुढील राजकीय वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह शिंदे यांची शिवसेना असे दोन पर्याय खतगावकर व त्यांच्या समर्थकांसमोर मागील महिनाभरात आले होते. पण त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी पुढाकार घेणारे बालाजी पाटील खतगावकर यांच्या प्रयत्नांत पक्षाच्या दोन स्थानिक आमदारांनी खोडा घातल्यानंतर खतगावकर यांनी पवारांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अलीकडे त्यांची अजित पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची मुंबईमध्ये भेट व चर्चा झाली होती.

खतगावकर व त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारच्या कार्यक्रमातच पक्षप्रवेश करावा, असा प्रस्ताव पक्षाकडून देण्यात आला होता. पण पक्षप्रवेशापूर्वी देगलूर, बिलोली, नायगाव व अन्य भागांतील आपल्या समर्थकांसमवेत विचारविनिमय करून निर्णय अंतिम करण्याची भूमिका खतगावकर यांनी घेतली होती. त्यानुसार येत्या काही दिवसांत ते वेगवेगळ्या भागातील समर्थकांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर शंकरनगर (ता.बिलोली) येथे मोठा कार्यक्रम आयोजित करून हजारो समर्थकांसह ‘राष्ट्रवादी’मध्ये प्रवेश करतील, असे आता ठरले आहे.

अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या खतगावकरांकडील भेटीदरम्यान माजी आमदार अविनाश घाटे, ओमप्रकाश पोकर्णा, आ. चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील आदी हजर होते. पवार यांचे खतगावकरांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर उपस्थित राजकीय कार्यकर्त्यांशी त्यांनी अनौपचारिक संवाद साधला. त्यानंतर वरील दोन नेत्यांसह खतगावकर व इतरांची बंद खोलीमध्ये स्वतंत्र चर्चा झाली. या चर्चेचा तपशील खतगावकर व त्यांच्या समर्थकांनी अद्याप उघड केलेला नाही; पण एकंदर चर्चा चांगल्याप्रकारे झाल्याचे खतगावकर यांनी शनिवारी सांगितले.

भाजप नेत्याचा सल्ला अव्हेरला

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातील काही नेत्यांमुळे खतगावकर आणि त्यांचे समर्थक पक्षापासून दुरावले होते. असे असले, तरी खतगावकर व त्यांच्या सुनबाईंनी काँग्रेसमध्येच राहावे, असा सल्ला भाजपात असलेल्या त्यांच्या नात्यातील नेत्याने अलीकडे दिला होता. पण खतगावकरांनी हा सल्ला अव्हेरल्याचे आता स्पष्ट झाले आहे.