Ajit Pawar on Yogi Adityanath ‘Batenge to Katenge Comment : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर चढला आहे. सर्व पक्षातील नेत्यांचे व स्टार प्रचारकांचे राज्यभर दौरे चालू आहेत. तसेच निवडणुकीला उभे असलेले उमेदवार आपापल्या मतदारसंघातील गावागावांत, गल्लीबोळात फिरतायत. भाजपाने त्यांचे महाराष्ट्रातील व देशातील स्टार प्रचारक या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यापैकीच एक आहेत. योगी आदित्यनाथ हे राज्यातील प्रचारसभेतून ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत असून मतदारांनी काय केलं पाहीजे याचे सल्ले देत आहेत. भाजपा नेत्यांनी देखील हा नारा उचलून धरला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा नारा समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला आहे. मात्र, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मात्र या घोषणांपासून आंतर राखलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “बाहेरच्या राज्यातील नेते येऊन काहीही वक्तव्ये करत आहेत. परंतु, महाराष्ट्राने नेहमीच जातीय सलोखा जपलेला आहे.” योगी आदित्यनाथांचं हे वक्तव्य आणि त्यावरील अजित पवारांच्या प्रतिक्रियेमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये तेढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारसंभांमध्ये हे तिघेही दिसत नाहीत. पक्षाने देखील अशा कुठल्याही सभेचं आयोजन केलेलं नाही.
हे ही वाचा >> काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी करणं चुकीचं ठरेल. महाराष्ट्रातील जनतेने आजवर पुरोगामीपण जपलं आहे. बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी इथे येऊन वेगळी वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे. बाहेरच्या राज्यातील नेते जे विचार मांडत आहेत, ते विचार महाराष्ट्राने कधीच मान्य केलेले नाहीत.” हे वक्तव्य करत असताना अजित पवारांनी योगी आदित्यनाथांचा उल्लेख करणं टाळलं.
अजित पवार व त्यांच्या पक्षासाठी मोदी-शाहांची एकही सभा झालेली नाही
दरम्यान, मोदी-शाहांच्या सभा न घेण्यावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, “मी बारामती मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभा घेण्याची विनंती केली नाही. कारण, येथील लढाई ही कौटुंबिक आहे”. या मतदारसंघात अजित पवारांविरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार यांनी आव्हान निर्माण केलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकीटावर ही निवडणूक लढवत आहेत.
हे ही वाचा >> आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला वेगळ्या रणनितीची आवश्यकता
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार) वेगळी रणनिती असायला हवी, असं पक्षातील नेत्यांचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या मित्रपक्षांची धोरणं व प्रचाराचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फारसा फायदा होणार नाही. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी हा त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याचं देखील पक्षातील नेत्यांनी मान्य केलं आहे.
हिंदुत्ववादी पक्षांशी युती केल्यानंतर मुस्लीम मतदार दुरावण्याची भिती
ही विधानसभा निवडणूक अजित पवारांच्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे. अशातच योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यांचा पक्षाला निवडणुकीत फटका बसू शकतो. भाजपा व शिवसेना (शिंदे) हे हिंदुत्त्ववादी पक्ष आहेत. तर अजित पवारांचा पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतो. अशातच योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यामुळे मुस्लीम मतदार त्यांच्यापासून दूर होईल याची अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना भिती आहे.
हे ही वाचा >> खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक
हिंदुत्ववादी विचारांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गोची
जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले. त्यापैकी अजित पवारांचा गट भाजपा-शिवसेनेच्या (शिंदे) युतीबरोबर सत्तेत जाऊन बसला. हे करत असताना अजित पवार म्हणाले, “आम्ही विकासासाठी मोदींबरोबर आलेलो आहोत. मोदी देशाचा विकास करत असून आम्हालाही त्यांच्याबरोबर आमच्या राज्याचा विकास करायचा आहे, म्हणून आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए/महायुती) आलेलो आहोत”. मात्र त्यांचे हे साथीदार (भाजपा-शिवसेना) उजव्या विचारसरणीचे आहेत. या पक्षांनी, त्यांच्या नेत्यांनी केलेल्या सांप्रदायिक वक्तव्यांमुळे अजित पवारांची व त्यांच्या पक्षाची नेहमीच गोची झाल्याचं पाहायला मिळतं.
हे ही वाचा >> महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
महायुतीत कमी महत्त्व?
महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यातील तब्बल १४८ जागा लढवत आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेला ८० जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या पक्षाच्या वाट्याला केवळ ५३ जागा आल्या आहेत. त्यापैकी ४१ जागांवर त्यांचे विद्यमान आमदार निवडणूक लढवत आहेत. त्यांना अधिकच्या केवळ १२ जागाच मिळाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला ४० आमदार असलेल्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाला दुप्पट जागा मिळाल्या आहेत. १०५ आमदार असलेल्या भाजपाने अधिकच्या ४३ जागा मिळवल्या आहेत.