छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘ मराठा आरक्षणा’ च्या मागणीसाठी सत्ताधारी नेत्यांची होणारी अडवणूक अजूनही कायम असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ‘ एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्याच वेळी मुस्लिम समाजातील तरुणांनी रामगिरी महाराजांना अटक करा, या मागणीसाठी त्यांच्या वाहनाचा ताफा अडवला. या दोन्ही घटना अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे व बाबासाहेब पाटील यांच्या वसमत आणि अहमदपूर मतदारसंघात घडल्या हे विशेष.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अडकून पडलेले अजित पवार आता मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पुतळा प्रकरण तापत असल्याचे लक्षात आल्यानंतर ते माफी मागून मोकळे झाले. बहुतांश सत्ताधारी नेत्यांची मदार आता ‘लाडकी बहीण’ योजनेवर अवलंबून असल्याने अजित पवारही आपल्या प्रचारात ही योजना निवडणुकीनंतरही सुरू राहील, असे सांगत फिरू लागले आहेत.
हेही वाचा…जालन्यात अजित पवार गट आग्रही
मराठवाड्यात अजित पवार यांच्या समर्थक आमदारांची संख्या शरद पवारांपेक्षा अधिक. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आसबे, बाबासाहेब पाटील, राजू नवघरे ही अजित पवार यांच्या पाठिशी राहिली.
वसमतमध्ये जयप्रकाश दांडेगावकर विरुद्ध राजू नवघरे अशी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे. अन्य मतदारसंघातही जागावाटपात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी उभी रहावी असे जागावाटपाचे सूत्र ठरले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘ आपल्या’ आमदारांना ताकद देण्यासाठी मराठवाड्यात अजित पवार दौरा करत आहेत. या दौऱ्यात पुन्हा एकदा आरक्षण प्रश्नावरुन आंदोलक त्यांना प्रश्न विचारत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेत आरक्षणाचा विषय तापल्यामुळे मराठवाड्यातून भाजप शुन्यावर आली. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोषाची झळ आता अजित पवार यांनाही बसू लागली आहे. आरक्षणाबाबतची भूमिका जाहीर करा, असे म्हणत कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना घेरले. त्यामुळे गाडीतून उतरुन त्यांना मराठा आंदोलकांचे निवेदन स्वीकारावे लागले.
हेही वाचा…कारण राजकारण: बागडे राजभवनात, काळे लोकसभेत; फुलंब्रीत कोण?
मराठवाड्यातील विविध मतदारसंघात जाताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे पक्षाचा असा कोणताही उपक्रम आखलेला नाही. त्यामुळे सरकारच्या योजनांच्या आधारे आणि कोणत्या मतदारसंघात किती निधी दिला, हे सांगत त्यांना प्रचार करावा लागत आहे. येत्या काळात कोणत्या मतदारसंघात ताकद लावायची, याची चाचपणीही केली जात असताना अजित पवार यांना आरक्षण मागणीच्या घोषणांना सामोरे जावे लागत आहे.