नागपूर : सिंचन घोटाळा प्रकरणात भाजपने अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी केल्यावरही बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत फलकावर अजित पवार यांच्या बरोबरीतच देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राला बरोबरीचे स्थान देऊन दोन्ही नेते साथसाथ असल्याचा संदेश दिला आहे.
नागपुरातील छत्रपती चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने भलामोठा स्वागत फलक लावला आहे. तो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वाशीम जिल्हा परिषद अध्यक्षाने लावलेल्या या फलकावर उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे सारखे छायाचित्र आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी भाजपनेच केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दरवर्षी नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकरणात एक गुन्हा दाखल केला जायचा. त्यावरून तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या अजित पवार यांची कोंडी केली जायची. भाजप राजकीय हेतूने सिंचन घोटाळ्याचा वापर करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जायचा. मात्र राजकारणात कोणीच कोणाचे कायमचे शत्रू वा मित्र नसतात, असे म्हटले जाते. भाजप व राष्ट्रवादीबाबतही असेच घडले. अजित पवारांचा गट वेगळा होऊन शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे पूर्वीचे राजकीय विरोधक आताचे राजकीय मित्र झाले. त्याचे प्रतिबिंब राष्ट्रवादीने लावलेल्या फलकातून दिसून येत आहे.
हेही वाचा – पुरोगामी, डाव्या पक्षांची प्रागतिक पक्षाच्या झेंड्याखाली एकजूट
हेही वाचा – मुंबईत राष्ट्रवादीसमोर दुहेरी आव्हानांचा सामना
एक वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवून नवे सरकार आले तेव्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे वाटत असताना त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. यामुळे फडणवीस समर्थक नाराज झाले होते व त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याविषयी अप्रत्यक्षरित्या नाराजी (स्वागत फलकावरून छायाचित्र वगळून) व्यक्त केली होती. आता त्याच अमित शहांच्या कृपेने अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. फडणवीस यांच्याकडील अर्थखाते त्यांच्याकडे गेले. तरी त्यांच्या समर्थकांकडून कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही.