संतोष प्रधान
ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या वादात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
शिंदे आणि भाजपमध्ये दोन दिवस जाहिरातींवरून कलगीतुरा सुरू आहे. शिंदे यांच्या जाहीराती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र नसणे किंवा शिंदे यांची लोकप्रियता फडणवीस यांच्यापेक्षा अधिक असणे हे मुद्दे भाजपला फारच जिव्हारी लागले आहेत. भाजपच्या नाराजी नाट्यानंतर शिवसेनेने दुसऱ्या दिवशी जाहिरातीत सुधारणा केली तरीही झाल्या प्रकाराहबद्दल बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा… मावळमध्ये काँग्रेसचेही दबावाचे राजकारण
शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद वाढत असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा हे शिंदे आणि भाजपमधील वाद वाढण्यास कारणीभूत ठरला आहे. हा गुन्हा नोंदविणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी भाजपने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. याच पोलीस निरीक्षकाच्या विरोधात कारवाईची मागणी अजित पवार यांनी केली. शिंदे विरोधात भाजप आणि अजित पवार हे एका बाजूला असल्याचे चित्र दिसते. तसेच ठाणे जिल्ह्यात कोणाकोणाला पोलीस संरक्षण दिले याची मागणीही पवार यांनी केली. कारण ठाणे जिल्ह्यात शिंदे समर्थकांना मोठ्या प्रमाणावर पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. अगदी साधे कार्यकर्ते कमांडोच्या संरक्षणात फिरत आहेत. अजित पवार यांनी यावरच नेमके बोट ठेवले.
हेही वाचा… विदर्भातही शिंदे गटाच्या विरोधात भाजपमध्ये खदखद वाढली
पोलीस निरीक्षकाच्या विरोधात भाजप आणि विरोधी पक्षनेते पवार यांनी तक्रार केल्यावर फरक पडतो का हे बघायचे. कारण या निरीक्षकाला शिंदे यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. यामुळे हा पोलीस अधिकारी कायम राहिल्यास शिंदे यांनी गृहमंत्रीपद असलेल्या भाजपवर कुरघोडी केली असे मानले जाईल.