Ajit Pawar Frequent Delhi Visits: कधीकाळी ‘सुप्रिया सुळे संसदेत, शरद पवार दिल्लीत आणि मी महाराष्ट्रात’ किंवा ‘सुप्रिया सुळे लोकसभेत आणि मी विधानसभेत’ असं म्हणणाऱ्या अजित पवारांसाठी आता महाराष्ट्र ते दिल्ली हे अंतर कमी झालंय की काय असं वाटू लागलं आहे. याला कारण गेल्या काही काळात त्यांच्या वाढलेल्या दिल्लीवाऱ्या! एकत्र राष्ट्रवादीत आपण महाराष्ट्रात राहणार अशीच भूमिका असणाऱ्या अजित पवारांचे राष्ट्रवादी विभक्त झाल्यापासून दिल्ली दौरे चांगलेच वाढले आहेत. याला कारणीभूत त्या त्या वेळची परिस्थिती आणि राजकीय घडामोडी जरी असल्या, तरी आता अजित पवारांसाठी ‘अब दिल्ली दूर नहीं’ अशीच झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
१९९१ साली सर्वप्रथम अजित पवारांनी लोकसभेत खासदार म्हणून पाऊल ठेवलं. पण पदार्पणाच्या अवघ्या दोन महिन्यांतच अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आपल्या काकांसाठी, अर्थात शरद पवारांसाठी मोकळा करून दिला. पण त्यानंतर जवळपास ३० वर्षं अजित पवारांनी कायमच दिल्लीपेक्षा महाराष्ट्रालाच प्राधान्य दिलं. या काळात क्वचितच त्यांचे दिल्ली दौरे पाहायला मिळाले. पण आता मात्र चित्र बदलल्याचं दिसू लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष!
२०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवारांसह जवळपास ४० आमदारांचा मोठा गट बाहेर पडला. त्यापाठोपाठ काही खासदारही आले. फुटलेल्या गटानं आपणच खरा पक्ष असल्याचा दावा केला. न्यायालयात आणि विधानसभा अध्यक्षांसमोर त्यांचा हा दावा खरा मानला गेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांच्या पदरात पडलं. अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. पण त्यानंतर लागलीच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली आणि त्यांना थेट दिल्लीतील जनपथ या हाय प्रोफाईल रस्त्यावरचं ‘लेव्हल ७’ या उच्च श्रेणीतलं घर शासकीय निवासस्थान म्हणून मिळालं. पर्यायाने खुद्द अजित पवारदेखील दिल्लीचे ‘रहिवासी’ झाले.
शरद पवारांच्या समोरचंच घर कसं मिळालं?
आता सुनेत्रा पवार यांना पहिल्याच खासदारकीच्या टर्ममध्ये थेट जनपथ रस्त्यावर त्यांचे चुलत सासरे शरद पवार यांच्यासमोरचंच निवासस्थान कसं मिळालं? शासकीय निवासस्थानांच्या श्रेणीतील थेट दुसऱ्या श्रेणीचा बंगला कसा मिळाला? त्यात अजित पवारांचा राजकीय हस्तक्षेप होता का? अशा अनेक मुद्द्यांवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. पण राज्यसभेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेअरमन व हाऊस कमिटीचे प्रमुख एखाद्या सदस्याला विहीत श्रेणीपेक्षाही वरच्या श्रेणीतील निवासस्थान देऊ शकतात.
देशाच्या सत्ताकेंद्राचेच रहिवासी झाले असताना अजित पवारांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याचं दिसून आलं. निवडणुकांच्या आधी जागावाटपाच्या चर्चा करण्यासाठी आणि निवडणुकांनंतर खातेवाटपाच्या चर्चांसाठी अजित पवार दिल्लीत जाऊन भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करताना दिसले. खुद्द दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन खासदार, राज्यसभेत प्रफुल्ल पटेल व लोकसभेत सुनील तटकरे, असतानाही खुद्द अजित पवारांना वाटाघाटींसाठी दिल्लीवाऱ्या कराव्या लागत आहेत म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना शरद पवारांसोबत अजित पवार कोणत्याही वाटाघाटीच्या चर्चांमध्ये युपीएच्या बैठकीत दिसले नाही. पण फूट पडल्यानंतर भाजपाशी वाटाघाटींसाठी अजित पवार वरचेवर दिल्लीत येऊ लागले. गेल्या आठवड्याभरातच अजित पवारांनी दोन वेळा दिल्लीवारी केली. एकदा सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेल्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी अजित पवार दिल्लीत दाखल झाले होते.
दुसऱ्यांदा खुद्द शरद पवारांच्या वाढदिवशी त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी अजित पवार सहकुटुंब हजर झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील अनेक प्रमुख नेतेही उपस्थित होते. यावेळी राजकीय चर्चांना उधाण आलं. दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार का? अशीही चर्चा रंगली. पण या चर्चा उठल्या तशाच हवेत विरूनही गेल्या. यानंतर अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली.
महाराष्ट्रातील मित्रपक्षांमधील अहमहमिका?
दरम्यान, अजित पवारांच्या या दिल्ली दौऱ्यांमागे महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी या भाजपाच्या दोन्ही मित्रपक्षांमध्ये सत्तेतील ‘नंबर २’ साठी असणाही अहमहमिका कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदेंनी अजित पवारांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी, पण सत्तेमध्ये मोठा आणि महत्त्वाच्या खात्यांचा वाटा मिळावा, यासाठी एकनाथ शिंदे जोरकस प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत एकनाथ शिंदेंची जवळीक असून अजित पवारांचे देवेंद्र फडणवीसांशी चांगले सूर जुळल्याचं बोललं जातं. पण आता अजित पवारांना हे गणित बदलायचं असल्याचं दिसत आहे.
पक्षांतर्गत काय आहे भूमिका?
अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय नेते असून त्यांनी इतर मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीवारी केली तर त्यात चूक काय? अशी भूमिका त्यांच्या पक्षातून एका नेत्यानं मांडली. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातून मात्र दिल्लीत अजित पवारांच्या वतीने वाटाघाटी करण्यासाठी कुणीही नसल्यामुळेच त्यांना वारंवार दिल्लीला जावं लागत असल्याची खोचक टिप्पणी करण्यात आली.