धुळे : लाडकी बहीण योजना आणल्याने विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. परंतु आम्ही रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर १७ तारखेला भगिनींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करणार आहोत. गुप्तचर विभागाने जिवाला धोका असल्याचे सांगितले. परंतु भगिनींच्या राख्यांचे सुरक्षाकवच असताना आपणास कुठलाही धोका नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे सोमवारी सकाळी धुळे शहरात जोरदार स्वागत झाले. शहरातील जेलरोडवर आयोजित महिला मेळाव्यात अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरच अधिक भर दिला. जनसन्मान यात्रेनिमित्त सर्वत्र महिला-भगिनींकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. त्यांचे प्रेम पाहून आम्ही भारावलो आहोत. यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जाणीवपूर्वक शेतकरी, महिला, युवक, युवतींशी बोललो. सर्व घटकांसाठी नवीन काय योजना आणता येतील, याबाबत चर्चा केली. त्यांचे दु:ख समजून घेतले. राज्याचा अर्थमंत्री म्हणून जे शक्य ते सर्वकाही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे या चांगल्या योजना आणू शकलो, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>लोकसभेतील यशानंतर मराठवाड्यातील काँग्रेसमधील मरगळ गायब
‘आशीर्वाद द्या, अन्यथा पंधराशे रुपये परत घेईन!’
विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद हवेत. आमचे सरकार आले, तर तुम्हाला देण्यात येणारे पैसे दीड हजारांवरून तीन हजार करू. पण ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ. तुमचा भाऊ म्हणून मी हे सांगत आहे, असे धक्कादायक वक्तव्य बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.