साताऱ्यात अजित पवार गटाने आक्रमक होत लोकसभा तसेच विधानसभेच्या जागांवर दावा केला आहे. पक्ष सरकारमध्ये सामील झाला म्हणून लोकसभा विधानसभेच्या जागा सोडणार नाही. त्यामुळे जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सारे काही सुरळीत होईल असे चित्र जिल्ह्यात दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार गटाने प्रमुख कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या पहिल्याच बैठकीत आक्रमक होत लोकसभा विधानसभेच्या जागांवर दावा केला. भाजपनेही तयारी सुरू केली आहे, मात्र अजित पवार गटाने जागा वाटपावरून तडजोड नाही अशीच भूमिका घेतली आहे. यामुळे जागा वाटपावरून दोन्ही पक्ष समोरसमोर येणार आहेत.

हेही वाचा – तेलंगणात अमित शाहांची मोठी घोषणा, निवडणूक जिंकल्यास मागासवर्गीय समाजातील नेत्याला मुख्यमंत्रिपद!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कूट पडल्यानंतर पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातही पक्षात उभी फूट पडली. दोन्ही गटांनी जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत .या गटाच्या बैठकीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार मकरंद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. या गटाने पक्ष संघटना वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि सहकाऱ्यांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला होता. त्यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन करून साताऱ्यात मोठी वातावरण निर्मिती केली होती. यावेळी शरद पवारांना युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. सुरुवातीला अजित पवार यांच्यासोबत असणारे वाईचे आमदार मकरंद पाटील यावेळी शरद पवार यांच्या दौऱ्यात सामील झाल्यामुळे या दौऱ्याची मोठी चर्चा झाली होती. नंतर मकरंद पाटील यांनी घुमजाव करत अजित पवार यांना पाठिंबा दर्शविला होता. सातारा हा शरद आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पृथ्वीराज चव्हाण वगळून सर्व आमदार व दोन खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते. यानंतर आजपर्यंत सातारा जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसची छाप राहिली आहे. शरद पवार गटात बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे हे दोन आमदार आहेत. तर जिल्ह्याच्या राजकारणाचे सूत्रधार विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आमदार मकरंद पाटील अजित पवार गटाकडे आहेत. यांच्याबरोबर आमदार दीपक चव्हाणही आहेत.

हेही वाचा – मध्य प्रदेशात काँग्रेसला १३० जागा मिळतील!

सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार गट पक्ष बांधणीपासून बराच दूर होता. उपमुख्यमंत्री पवार साताऱ्यातून कोल्हापूरकडे जाताना त्यांचे स्वागत करण्यात आले. तरीही काही महिने पक्षाला जिल्हाध्यक्षच नव्हता. तसेच या गटाचे पक्ष संघटन शिथील पडल्याचे दिसत होते. भाजपनेही या संधीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याने वातावरण निर्मिती केली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची घुसमठ वाढली होती.

अजित पवार गटाने रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली. त्यांनी यापूर्वी जिल्हापरिषद अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा जिल्ह्यात चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी भवन सोडून दूध संघाच्या कार्यालयात घेतली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढवायच्या आहेत. आपल्याला विकास आणि विचारांचे राजकारण करायचं आहे. कोणाशी वाद करायचे नाहीत. अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही. कोणत्या निवडणुका कधी लागणार माहीत नाही, मात्र आपला पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुका लढेल. शत्रू कमीत कमी तयार करा. गाव तालुका पातळीवर वातावरण तयार करा, अशा सूचना रामराजे आणि मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या.