विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : शिवडी-न्हावाशेवा अटल सागरी सेतूसह विविध पायाभूत सुविधांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शुक्रवारी महायुतीच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पहायला मिळाले. ठाणे, रायगड, नवी मुंबई या मुंबई महानगर प्रदेशातील महायुतीसाठी सुपीक समजल्या जाणाऱ्या प्रदेशातून नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांना एकत्र आणत पंतप्रधानांच्या स्वागतासाठी शिवसेना-भाजप या दोन पक्षांनी समन्वयाची रंगीत तालीम करून पाहिली. या दोन पक्षांच्या तुलनेत महायुतीत नव्यानेच सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा सहभाग या आयोजनात फारसा लक्षवेधी ठरला नसला तरी कार्यक्रमस्थळी आणि आसपासच्या परिसरात बॅनर आणि होर्डिंगवर मात्र अजित पवारांना ‘मानाचे’ स्थान देण्याची खबरदारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी घेतल्याचे पहायला मिळाले.
मुंबई महानगर पट्ट्यात लोकसभेच्या एकूण दहा जागा आहेत. याशिवाय रायगड जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा मोडतात. शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूमुळे नवी मुंबईच्या आणि विशेषत: रायगड जिल्ह्यातील अर्थकारणावर सकारात्मक परिणाम दिसू शकणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पट्ट्यात मोडणाऱ्या पनवेल आणि उरण या दोन विधानसभा क्षेत्रात सध्या भाजपचे आमदार आहेत. याच मतदारसंघांना लागूनच असलेल्या नवी मुंबईतही मंदा म्हात्रे, गणेश नाईक हे दोन भाजपमध्ये आमदार आहेत. त्यामुळे अटल सागरी सेतूमुळे भाजपच्या या चारही जागांवर सकारात्मक परिणाम दिसू शकेल असे येथील नेत्यांना वाटते. या संपूर्ण पट्ट्यातील भाजपच्या ताकदीच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष या भागात अगदीच नावाला आहे. पनवेल तसेच उरण या दोन्ही मतदारसंघात शिंदेंच्या सेनेला अजूनही बाळसे धरायचे आहे. नवी मुंबईतही गणेश नाईकांना अजूनही फारसे आव्हान उभे करण्यात शिंदेसेनेला फारसे यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या उपस्थित होत असलेल्या लोकार्पण सोहळ्याच्या आयोजनाची धुरा भाजपच्या नेत्यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसून आले.
हेही वाचा – पुण्यातील महायुती मेळाव्यात अजित पवार भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणता सल्ला देणार ?
महायुतीत समन्वयाचा नवा अध्याय
पनवेल आणि उरण भागातील भाजप नेत्यांनी या कार्यक्रमासाठी गर्दी जमवीणे तसेच इतर तयारीसाठी मोठी ताकद लावली. भाजपच्या या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी रसद यासाठी मिळाल्याचे बोलले जाते. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी याठिकाणची पहाणी केली. तेव्हा भाजपचे हे दोन्ही आमदार त्यांच्यासोबत होते. पंतप्रधानांच्या रोड शोची जबाबदारी भाजप आमदारांकडे सोपवून मुख्यमंत्री मार्गस्थ झाल्याचे पहायला मिळाले. असे असले तरी ठाणे, नवी मुंबईतून आपल्या संघटनेच्या नेत्यांना गर्दी जमविण्यासाठी आवश्यक ती रसद मुख्यमंत्र्यांकडून पुरविण्यात आली होती. ठाणे, कल्याण डोंबिवली यासारख्या मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या भागातून विशेष वाहनांमधून सभास्थळी माणसे आणली जात होती. हे करत असताना भाजप नेत्यांशी समन्वय ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना दिल्या होत्या.
हेही वाचा – अटल सेतूच्या शुभारंभाला रामाचा नारा, विकास प्रकल्पातून महायुतीची हिंदुत्वाची पेरणी
अजित पवारांना मानाचे स्थान
ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजप शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही कार्यक्रमाच्या आयोजनात सामावून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपकडून स्थानिक नेत्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या होर्डिंग्ज तसेच बॅनरवर अजित पवार, आदिती तटकरे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना स्वतंत्र स्थान देण्यात आले होते. याशिवाय शिवेसना-भाजप पक्षांसह राष्ट्रवादीचे झेंडेही जागोजाही उभारण्यात आले होते.