नगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद माजी सदस्य राणी लंके यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत आपण किंवा पती आमदार लंके निवडणूक लढवणारच असा मनसुबा जाहीर करत, मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीत नगर दक्षिण मतदारसंघात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे सध्या प्रतिनिधित्व करतात. पुन्हा उमेदवारी करण्यासाठी त्यांनी मतदारसंघात गावोगाव साखर आणि चणाडाळ वाटप करत जनसंपर्काची मोहीम सुरू केली आहे. राणी लंके यांनीही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्ष, चिन्ह कोणता याची वाच्यता न करता केवळ कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे.

हेही वाचा – महायुती आणि इंडिया आघाडीत उमेदवारीवरून पेच

खासदार विखे व आमदार लंके दोघेही महायुतीत असले तरी दोघांतील राजकीय वैमनस्य जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत आमदार लंके केवळ दबावतंत्रासाठी निवडणूक लढवण्याची डरकाळी फोडत आहेत की परत शरद पवार गटाकडे माघारी जात उमेदवारी मागणार की अन्य काही पर्याय निवडणार याबद्दलची भूमिका त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र खासदार विखे यांच्या विरोधातील नाराजीची भावना शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून एकत्रित करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित कार्यकर्ते तोच अर्थ ध्वनीत करत आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजीमंत्री आमदार राम शिंदे यांनीही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केलेले आहे. मात्र केवळ इच्छा जाहीर करत ते शांत बसले आहेत. आमदार लंके यांनी मात्र शिवस्वराज्य यात्रा आयोजित करीत मतदारसंघात जनसंपर्क निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आमदार शिंदे व आमदार लंके यांच्यामध्ये सध्या सौहार्दपूर्ण वातावरण आहे. दोघेही उघडपणे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार विखे यांच्याविरोधात भूमिका घेण्यात आघाडीवर आहेत. जिल्ह्यात विरोधी पक्षातून विखेंविरोधात फारशी आक्रमकता दाखवली जात नसली तरी ती उणीव स्वपक्षातील राम शिंदे व मित्रपक्षातील निलेश लंके भरून काढत आहेत. निवडणूक लढवण्याच्या निलेश लंके यांच्या भूमिकेवर अद्याप राम शिंदे आणि सुजय विखे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. विचारणा करूनही खासदार विखे यांनी त्यावर जाणीवपूर्वक मौन बाळगले आहे, मात्र मंत्री राधाकृष्ण विखे यांनी, स्वयंघोषितांची उमेदवारी कोण थांबवणार? महायुतीमध्ये पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागेल, असा टोला लगावला आहे.

हेही वाचा – शरद मोहोळ यांच्या कुटुंबियांना राजकीय आश्रय?

राष्ट्रवादी एकत्रित असताना पवार कुटुंबियांशी आमदार लंके जवळीक साधून होते. शिवसेनेत फूट पडली तेव्हा नव्याने आलेल्या भाजप-शिंदे युतीच्या बहुमताच्या परिक्षेवेळी आमदार लंके अनुपस्थितीत राहून त्यांनी स्वतःबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर लंके यांनी सुरुवातीला शरद पवार गटाकडे धाव घेतली. नंतर निधीच्या मुद्द्यावरून ते परत अजितदादा गटाकडे आले. महाविकास आघाडीत शरद पवार गटाने नगर दक्षिण मतदारसंघावर दावा ठोकलेला आहे. पवार गटात सध्या नगर दक्षिण मतदारसंघात सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. एकत्रित राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी निलेश लंके यांचे नाव त्यावेळी आघाडीवर होते. त्यांनीही उमेदवारीची पूर्वतयारी सुरू केली होती. ‘नगर दक्षिण’मधील इतर विधानसभा मतदारसंघातील प्रश्न हाताळत खासदार विखे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचे मूळ पारनेरमधील विखे-लंके यांच्यातील राजकीय वैमनस्यात दडलेले आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काही काळ लंके शांत होते. आता त्यांच्याऐवजी पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा आयोजित करत त्या किंवा आमदार लंके लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. या यात्रेत अजितदादा गट, ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी होताना दिसतात. निलेश लंके पूर्वी शिवसेनेत होते. ते हितसंबंध त्यांना यात्रेसाठी उपयोगी पडताना दिसत आहेत. आमदार लंके स्वतः मात्र यात्रेत सहभागी नाहीत. त्यामुळेच त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar group mla nilesh lanke initiative to unite vikhe opponents print politics news ssb
Show comments