नाशिक : आगामी विधानसभा निवडणूक ही माता-बहिणींची आहे. राज्यातील सत्तेत कुणाला आणायचे हे त्या ठरवणार आहेत. माय-माऊलींना गावोगावी जाऊन त्यांचे महत्त्व पटवून दिले जाईल. आपला भाऊ, मुलगा समजून आशीर्वाद द्या. लाडक्या बहिणींसह विविध घटकांसाठी राबविलेल्या योजना कायमस्वरुपी सुरू ठेवल्या जातील. महाराष्ट्राची प्रगत राज्य म्हणून ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला गुरुवारी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेवर संपूर्णपणे प्रकाशझोत ठेवण्यात आल्याचे दिसून आले. दिंडोरी व देवळाली मतदारसंघातील मेळाव्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम साजरे झाले. लाडक्या बहीण योजनेतील दीड हजार रुपयांच्या रकमेच्या धनादेशाची प्रतिकृती त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात वितरित करण्यात आली.

हेही वाचा >>> पश्चिम बंगालवर सहा दशके राज्य करणाऱ्या डाव्यांचा शेवटचा नेता हरपला; अशी होती बुद्धदेव भट्टाचार्य यांची कारकीर्द

यानिमित्ताने पक्षाने महिला वर्गात मतपेरणीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. दुसरीकडे यात्रेचा प्रकाशझोत केवळ अजित पवार यांच्यावर राहील याची दक्षता घेतल्याने ज्येष्ठ नेते, मंत्री भाषणापासून वंचित राहिले. महिला, युवावर्ग, शेतकरी, दूध उत्पादक, मुस्लीम बांधव, मातंग समाज अशा विविध घटकांसाठी राबविलेल्या योजनांची जंत्री पवार यांच्याकडून मांडण्यात आली. यात्रेला जनसन्मान नाव का देण्यात आले इथपासून ते ३३ वर्षांतील राजकीय कारकिर्दीतील कामगिरीची माहिती पवार यांनी कथन केली.

सारं कसं गुलाबी, गुलाबी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत सर्वकाही गुलाबी दिसून आले. यात्रेतील वाहनांच्या ताफ्यात गुलाबी रंगाच्या वाहनांनी लक्ष वेधले. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग वाहनांसाठी वापरण्यात आला. यात्रेत सहभागी होणारे मंत्री, पदाधिकारी यांच्यासाठी असलेली व्हॅनिटी वाहनेही गुलाबी रंगाची होती. अजित पवार यांनी आपल्या पोषाखात केलेला बदल याआधीच चर्चेत आला असून जनसन्मान यात्रेतही त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते.

वीज तोडायला आले तर माझे नाव सांगा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा हजार कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच बहिणींच्या खात्यात जमा होतील. हा चुनावी जुमला नाही. शेतकऱ्यांना वीज पंपांचे देयकही माफ करण्यात आले. मागील देयके भरण्याची गरज नाही. कुणी शेतीची वीज तोडायला आले तर त्याला अजितदादांकडे पाठवून द्या, असे अजित पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar jan samman yatra started from dindori assembly constituency print politics news zws