परभणी : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्यासाठी माघार घेतलेल्या राजेश विटेकर यांच्या त्यागाची यथोचित नोंद राष्ट्रवादीने घेतली असून विधान परिषद निवडणुकीत विटेकर यांनी विजय संपादन केला आहे. गेल्या काही वर्षांपासून विटेकर यांना राजकीय यश हुलकावणी देत होते. मात्र, आजच्या निवडीने त्यांचे राजकीय पुनरागमन जिल्ह्याच्या वर्तुळात झाले आहे. विटेकर यांच्या रूपाने एका तरुण चेहऱ्याला राष्ट्रवादीने जिल्ह्यात पाठबळ दिले आहे.
लोकसभेची सर्व तयारी करूनही ऐनवेळी राष्ट्रीय समाज पक्षासाठी दोन पावले मागे आलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जिल्ह्यात राजेश विटेकर यांच्या रूपाने राजकीय गुंतवणूक केली. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता विटेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारीची संधी दिली आणि त्यांचा विधान परिषद निवडणुकीत जोरदार विजय झाला. लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या विटेकरांना महादेव जानकर यांच्यासाठी माघार घ्यावी लागली होती. त्याचवेळी विटेकर यांच्यावर अन्याय होणार नाही, पक्ष त्यांची यथोचित नोंद घेईल, असे आश्वासन अजित पवारांनी दिले होते.
हे ही वाचा… दिल्लीत पाणी तुटवडा, मुख्यमंत्री अटकेत आणि पक्षाला गळती; आप आमदाराने सोडला पक्ष
राजकीय पार्श्वभूमी असलेले विटेकर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. वडील उत्तमराव विटेकर व आई निर्मलाताई विटेकर हे दोघेही परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अनुभव असलेले एकाच कुटुंबातील तीन सदस्य असणे असे अपवादात्मक उदाहरण विटेकर यांच्या बाबतीत आहे. तरुण वर्गात लोकप्रिय असलेल्या विटेकर यांची जिल्हाभरात संघटनात्मक कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून खासदार संजय जाधव यांच्या विरोधात राजेश विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे सुरुवातीला निश्चित झाले होते. विटेकर कामालाही लागले होते. मात्र, ऐनवेळी रासपच्या महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली. २०१९ च्या निवडणुकीत विटेकर यांनी खासदार संजय जाधव यांच्याशी चांगली लढत दिली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी पुन्हा लोकसभा लढवण्याचा त्यांचा मनोदय होता. लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीने परभणीत युवक व विद्यार्थी मेळावे घेऊन कोणत्याही परिस्थितीत परभणीची जागा लढवायची असा चंग बांधला होता. जानकर यांच्यासाठी विटेकर यांना माघार घ्यावी लागली. मात्र, विटेकर यांनी केलेल्या त्यागाचे चीज राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केले आणि त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली. विटेकर यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
हे ही वाचा… ना किमान समान कार्यक्रम ना समन्वयक! आताची एनडीए वाजपेयींच्या काळापेक्षा वेगळी कशी?
विटेकर यांना विधान परिषदेवर घेण्यात येईल, असा शब्द पक्षाचे नेते अजित पवार यांनी परभणी जिल्ह्याला जाहीर सभेत दिलेला होता. या निवडीच्या निमित्ताने दादांनी आपला वादा पूर्ण केला आहे. कार्यकर्त्याच्या निष्ठेची कदर राष्ट्रवादीतच होऊ शकते आणि कार्यकर्त्याचा सन्मान केवळ राष्ट्रवादीतच होऊ शकतो हे या निवडीने सिद्ध झाले आहे. – प्रताप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस, शहर जिल्हाध्यक्ष