छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनागोंदी, जातीयवाद यावर उपाययोजना करण्यासाठी मुक्कामाचा वेळ काढेन. तसेच जिल्ह्यातील राख, वाळू आणि भूखंड माफियांना सुतासारखे सरळ करेन असे सांगत अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला. पुढील काही दिवसात बीडमध्ये सुधारणा करण्यासाठी अगदी मुक्कामाचा वेळ काढेन, असेही त्यांनी जाहीर केले.
परळीतील राखेतील गैरव्यवहारात काय पाऊले उचलली गेली, असा प्रश्न विधानसभेत चर्चिला गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये पालकमंत्री म्हणून दुसरी बैठक घेणार आहेत. जिल्हा नियोजनातील निधी वाटपावरुन त्यांनी नेमलेल्या उपजिल्हाधिकारी भोर समितीचा अहवालही अद्यापि गुलदस्त्यात आहे. सौर उर्जा आणि पवन उर्जा या क्षेत्रातील आढावा उपमुख्यमंत्री घेणार आहेत का, याविषयी अधिक उत्सुकता आहे. परळी औष्णिक वीज केंद्रातील अंतर्गत बाबी उर्जा खात्याच्या अंतर्गत येत असले तरी या केंद्रांच्या भोवती असणारे राखचे अवैध साठे, त्याची होणारी वाहतूक, यावरही अद्याप कारवाई झाली नाही. ही कारवाई जिल्हा प्रशासनाने करावी, अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र बैठकीत दिल्या होत्या. बैठकीपूर्वी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांनी माफियांना तसेच दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारांना इशारे दिले. कोणी कितीही जवळचा असला आणि कामाचा दर्जा राखला नाही तर त्याचे नाव काळ्या यादीमध्ये टाकू, असेही ते म्हणाले.

बीडचे प्रशासन सुधारण्यासाठी अजित पवार कसे प्रयत्न करतात, याची उत्सुकता सर्वत्र असल्याने दुसऱ्या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राख व अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना इशारा दिला. या बैठकीस प्रकृती बिघडल्याने हजर राहाता येणार नाही असे आमदार धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यमातून कळवले होते.

या मेळाव्यात चुकीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये स्थान नसल्याचे सांगत चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे, हार, स्मृतीचिन्ह आणू नयेत अशा सूचनाही त्यांनी केल्या. येत्या काळात बीडमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काय करावे याबाबतच्या सूचना घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, वकील आदींची स्वतंत्र बैठकही घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पालकमंत्री म्हणून कामाला वेग देऊच पण बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिस्त लावण्याचे कामही करू, असे पवार यांनी जाहीर केले.