पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांंच्यासारख्या बलाढ्य नेत्याशी दोन हात करत भाजपशी मैत्री केली. त्यावेळी अजित पवार यांनी सोबतीला येणे हे भाजपमधील अनेकांना रुचले नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही नापसंती दर्शवली असतानाही ते महायुतीत सामील झाले. त्यानंतर अजित पवार यांंच्यासमोर घरातीलच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष आणि भाजपमधील नाराजांचे दुहेरी आव्हान असतानाही जिल्ह्यात आठ जागा घेत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष भाजपपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. उमेदवारांंची योग्य निवड आणि अडचणीच्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा चाणाक्षपणा दाखविल्याने अजित पवार हे पुणे जिल्ह्यात यशस्वी झाले. मात्र, आता अजित पवारांंचे यश हे अनेक टप्प्यांवर भाजपसाठी आव्हानात्मक ठरले आहे.
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी पुणे शहरात आठ, पिंपरी-चिंचवड शहरात तीन आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत भाजपला नऊ, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला आठ, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला एक, शिवसेना (ठाकरे) पक्षाला एक, शिवसेना (शिंदे) पक्षाला एक आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आले. भाजप शहरात सहा, पिंपरी-चिंंचवडमध्ये दोन आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक जागा घेत प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला शहरात एक, जिल्ह्यात सहा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक जागा मिळाली आहे. त्यामुळे या दोन पक्षांना पुणे, शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात यश मिळाले आहे.
हेही वाचा – विरोधक मुक्त मतदारसंघाला मुख्यमत्र्यांचे प्राधान्य
राजकीय भवितव्य पणाला लागलेल्या अजित पवार यांना जिल्ह्यात भाजपपेक्षा एक जागा कमी मिळाली असली, तरी दोन महापालिका आणि ग्रामीण भाग अशा तिन्ही परिसरात त्यांना जनाधार मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. अजित पवारांचा राजकीय स्वभाव पाहता ते पुणे जिल्ह्यात सत्तेतील वाटा सहजासहजी देण्यास तयार होणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक लाभाच्या पदाच्या ठिकाणी जास्त जागा मिळवूनही भाजपला अजित पवार यांच्याशी दोन हात करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालकमंत्रीपदावरून पहिली ठिणगी ?
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून पहिली ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे पद अजित पवार की राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना द्यायचे, यावरून भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात जुंपणार आहे. भाजपने सर्वाधिक जागा घेतल्या असल्याने पाटील यांना हे पद देण्यासाठी भाजप आग्रही असणार आहे, तर अजित पवार यांची राष्ट्रवादी पवार यांच्याकडेच हे पद राहील, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे चौथ्यांदा अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात या पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांंच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा होती. मात्र, भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांंच्यात युती झाल्यानंतर हे पद चंद्रकांत पाटील यांंच्याकडे गेले. अजित पवार हे युतीत सामील झाल्यानंतर पुन्हा एकदा पवार यांंनी हे पद हिसकावून घेतले. त्यानंतर पाटील यांना पायउतार व्हावे लागले होते. आता चौथ्यांदा पालकमंत्रीपदासाठी पवार आणि पाटील हे समोरासमोर उभे राहणार आहेत.
पुण्याकडे लक्ष
विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर अजित पवार यांच्याकडून पुणे शहराकडे पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. सध्या भाजपच्या ताब्यात महापालिका असली, तरी भाजप, तत्कालीन शिवसेना आणि तत्कालीन राष्ट्रवादी यांचा राजकारणातला ‘पुणे पॅटर्न’ त्यांनी घडवून आणला होता. त्यावेळी काँग्रेसला म्हणजे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी अजित पवार यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला होता. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार हे कोणती भूमिका घेणार, याकडे भाजपचे लक्ष असणार आहे. त्यामुळे अजित पवार हे सध्यातरी पुणे शहरात भाजपसाठी डोकेदुखी झाले आहेत.
हेही वाचा – नाना पटोलेंच्या भ्रमाचा भोपळा फुटला; साकोलीत लाजिरवाणा विजय!
जिल्ह्यात वरचष्मा
जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रमुख आव्हान होते. जिल्ह्यातील दहा मतदार संघांपैकी सहा ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत होती. त्यामध्ये बारामती, आंबेगाव, इंदापूर, खेड-आळंदी, शिरुर आणि जुन्नर या मतदार संघांचा समावेश होता. त्यापैकी खेड-आळंदी आणि जुन्नरमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला पराभव पत्करावा लागला. मात्र, भोरमध्ये त्यांनी अनपेक्षितपणे विजय मिळविला. वडगाव मावळ आणि पुरंदरमध्ये अजित पवार यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयोग केला. त्यामध्ये वडगाव मावळमध्ये ते यशस्वी ठरले.पुरंदरमध्ये शिवसेना शिंदे पक्षाला जागा मिळाली. दौंडमध्ये त्यांनी भाजपला साथ दिली. अजित पवार यांच्या व्यूहरचनेमुळे जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला जिल्ह्यातून हद्दपार व्हावे लागले आहे. या निकालाने अजित पवार यांनी जिल्ह्यावर वरचष्मा असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतील जास्तीत जास्त निधी पक्षाला मिळण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे भाजपपुढे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिंंपरी-चिंचवड शहरात पुन्हा शिरकाव?
पिंपरी-चिंचवड महापालिका ही मागील पाच वर्षे वगळता अजित पवार यांच्या ताब्यात होती. एकेकाळचे त्यांंचे साथीदारच भाजपसोबत गेल्याने अजित पवार यांना काहीही करता आले नव्हते. आता अजित पवार हे भाजपबरोबर असल्याने आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरीची जागा पुन्हा मिळाल्याने भाजपची अडचण झाली आहे. त्यानिमित्ताने अजित पवार हे पुन्हा पिंपरी-चिंचवड शहरावर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे.