नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाब आणण्याचा प्रयत्न सपशेल फसला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार सलग दोन दिवस दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी ताटकळत बसून होते. मात्र शहांनी अखेरपर्यंत अजित पवार यांना भेट दिली नाही. त्यामुळे हिरमुसलेले पवार विनाभेट मंगळवारी सकाळी मुंबईला रवाना झाले. परंतु, आपण अमित शहा यांची भेट मागितली नव्हती, असा दावा अजित पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदासाठी दबावाचे राजकारण केल्याने व गृहमंत्रीपदासह पवार गटाच्या अर्थ, शेती-सहकार आदी महत्त्वाच्या मंत्रिपदांचाही आग्रह धरल्याने असुरक्षित झालेल्या अजित पवार यांनी सोमवारी संध्याकाळी दिलेली गाठली होती. शहांशी चर्चा करून पवार मुंबईला रवाना होणार होते. पण, अजित पवार दिल्लीत आले आणि अमित शहा चंदिगढला निघून गेले. त्यामुळे नाईलाजाने अजित पवार यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करावे लागले.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होताच संघ स्वयंसेवकामध्ये आनंद…..

शहा दिल्लीत येण्याची वाट पाहात असलेल्या अजित पवार यांनी प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून संभाव्य मंत्रीपदांबाबत चर्चा केली. शिंदे गटाकडून मंत्रिपदा हिसकावून घेतली जाणार असतील तर शहांसमोर अजिबात तडजोड न करण्याची कठोर भूमिका घेण्याबाबचही चर्चा झाल्याचेही समजते. पण मंगळवारी रात्रीपर्यंत शहांनी अजित पवार यांना भेटीसाठी वेळच दिली नाही.

गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या भेटीत मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता व मुंबईतील शपथविधी समारंभात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असे तिथेच शपथ घेतील असेही निश्चित झाले होते. शहांच्या बैठकीत मंत्रीपदांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिंदे व अजित पवार यांनी वेगवेगळ्या मंत्रीपदांबाबत आग्रह धरला होता. शहांची मंगळवारी भेट घेऊन मंत्रीपदांवर दावा करण्याचा अजित पवार यांचा इराद्याने सांगितले जात होते. पण शहांनी पवारांच्या दिल्लीवारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :Delhi Elections 2025 : आम आदमी पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास का दिला नकार? काय आहेत कारणे?

अजित पवार बुधवारी सकाळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार आदींसह मुंबईला रवाना झाले. गुरुवारी मुंबईत महायुतीच्या सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर नवनियुक्त मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रीपदे निश्चित करण्यासाठी पुन्हा दिल्लीला अमित शहांच्या भेटीसाठी येण्याची शक्यता आहे.

वेळ मागितली नव्हती

आपण दिल्लीत खासगी कामासाठी गेलो होतो. अमित शहा यांच्याकडे भेटीची वेळ मागितली नव्हती, असा दावा अजित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. पत्नीला राज्यसभा खासदार म्हणून मिळालेल्या बंगल्याची सजावट कशी करायची याबाबत वास्तुविशारदाशी चर्चा केली. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत सध्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात वकिलांची भेट घेतली. तसेच एका लग्न समारंभाला उपस्थित राहिलो, असे अजित पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar returned to mumbai without meeting amit shah claims visited delhi for other reasons print politics news css