Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जनपथ मार्गावरील ११ क्रमाकांचा बंगला देण्यात आला आहे. याच मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही निवासस्थाने आहेत. सुनेत्रा पवार यांची खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांना दुसऱ्या क्रमाकांचा दर्जा असलेला टाइप ७ प्रकाराचा बंगला देण्यात आला असून हा बंगला शरद पवार यांच्या ६ जनपथ या बंगल्याच्या समोर आहे. शरद पवार हे टाइप ८ दर्जाच्या बंगल्यात सध्या राहत असून त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेही याच बंगल्यात राहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीच्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ल्युटेन्स भागात सुनेत्रा पवार यांना पहिल्याच टर्ममध्ये टाइप ७ प्रकाराचे निवासस्थान मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नियमानुसार पहिल्या टर्ममधील खासदार दुसऱ्या सर्वात मोठ्या श्रेणीच्या निवासस्थानासाठी पात्र नाहीत, असेही सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी ४१ जागा जिंकून शरद पवार यांच्यावर कुरघोडी केली. त्यामुळे दिल्लीत दमदार मराठा नेता म्हणून आता अजित पवार पुढे येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर सुनेत्रा पवार यांना बहुप्रतिष्ठित निवासस्थान मिळाल्याचे बोलले जात आहे.

हे वाचा >> Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांनी लगेचच भाजपाला पाठिंबा देत, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला समर्थन दिले होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसला होता. बारामतीमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर लगेचच १८ जून रोजी त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी दिली. निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केल्याचे मान्य केले होते.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, ११ जनपथ हे निवासस्थान राज्यसभा श्रेणी अंतर्गत येते. याचा अर्थ याचे वाटप सभागृहाच्या गृह समितीने केलेले आहे. तर शरद पवार राहत असलेला ६ जनपथ हे निवासस्थान सामान्य श्रेणीच्या अंतर्गत येते. याचे व्यवस्थापन आणि वाटप व्यवस्थापन गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे केले जाते.

दरम्यान आज (१२ डिसेंबर) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्यासह ६ जनपथ निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस असल्यामुळे ही भेट घेतल्याचे अजित पवार यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. ११ जनपथमधून अजित पवार आणि त्यांचे सहकारी समोरच असलेल्या ६ जनपथवर आले होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट असल्यामुळे वाढदिवसापलीकडे जाऊन या भेटीची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आता एकत्र आले पाहीजे, अशी अपेक्षा काही कार्यकर्ते आणि नेत्यांनी व्यक्त केली होती.

सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानावर संजय राऊतांचा आक्षेप

संजय राऊत यांनीही आज शरद पवार यांची ६ जनपथ येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांच्या भेटीवर टीका केली. सुनेत्रा पवारांची पहिलीच टर्म असताना त्यांना टाइप ७ दर्जाचा बंगला कसा मिळाला? यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून खासदार आहे. मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो होतो. तेव्हा आम्हाला साधे घर दिले गेले. पण सुनेत्रा पवार यांना टाइप ७ दर्जाचा बंगला देऊन भाजपाने अजित पवार यांची सोय केली आहे. त्यांना दिल्लीत येता-जाता यावे, यासाठी हे केले असावे. भाजपा हे मुद्दामहून करते. नेत्यांना कमी लेखण्यासाठी हे कारस्थान केले जाते. दिल्ली ही कपट कारस्थानांची राजधानी आहे. दिल्लीत जितके कारस्थान रचले जाते, तेवढे जगात कुठेही पाहायला मिळत नाही.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar rising as maratha strongman wife sunetra pawar gets bungalow opposite to sharad pawar kvg