लातूर: उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये चर्चेत राहू शकणाऱ्या जिल्हा निर्मितीच्या मुद्दयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन बाळगणेच पसंत केले. क्रीडा मंत्री व अजित पवार यांच्या समर्थक आमदार संजय बनसोडे यांनी ही मागणी मेळाव्यात रेटली पण त्यावर अजित पवार यांनी भाष्य केले नाही.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जनसन्मान यात्रा सोमवारी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात होती, याप्रसंगी विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे ,क्रीडामंत्री संजय बनसोडे ,आमदार बाबासाहेब पाटील ,आमदार विक्रम काळे यांची या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा: Haryana Election: पंतप्रधान मोदी १४ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घटनेचा वारंवार उल्लेख का करतात? काय घडलं होतं तेव्हा हरियाणात?

उदगीर येथील जाहीर सभेत क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. गेल्या चार वर्षापासून विविध कार्यक्रमात संजय बनसोडे हे उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी लावून धरत आहेत. मात्र, सर्वच जण या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावत असल्याचे दिसते आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात संजय बनसोडे यांनी मोठा निधी आणला, रस्ते, पाणीपुरवठा, इमारतीचे बांधकाम आदी कामे मतदारसंघात झाले. मात्र, उदगीर स्वतंत्र जिल्हा व्हावा, उदगीरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशा उदगीरकरांच्या मागण्या प्रलंबित आहेत .

हेही वाचा : Jammu Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे वारे, लोकसभेपेक्षा विधानसभेला अधिक मतदान

उदगीर विधानसभा मतदार संघात संजय बनसोडे यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नेमके कोण राहतील याबद्दल आता नव्याने चर्चा आहे. दोन महिन्यापूर्वी उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपातून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये निवडणूक लढवलेले भाजपचे डॉ.अनिल कांबळे हेही शरद पवार गटात दाखल झाले आहेत. भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे हे गेल्या महिनाभरापासून उदगीरमध्ये ठाण मांडून चाचपणी करत आहेत. इंजिनीयर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड हे उदगीर मध्येच मुक्कामी असून तेही कसल्याही स्थितीत निवडणुकीत उतरतील असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक आघाड्यांवरती संजय बनसोडे यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू असून काँग्रेसनेही या जागेवर दावा सांगितला आहे. अमित देशमुख यांनी माजी नगराध्यक्षा उषा कांबळे या काँग्रेसच्या सक्षम उमेदवार असल्याचे म्हटले आहे. उदगीरची निवडणूक ही बहुरंगी होण्याची शक्यता असल्याने संजय बनसोडे हे आपली बाजू अधिकाधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करत असताना जिल्हा निर्मितीच्या मागणीवर मात्र अजितदादांचे मौन राहिल्यामुळे यावर उदगीर विधानसभा मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू आहे.