दिगंबर शिंदे
सांगली : दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावरील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागणी मान्य झाल्याने मागे घेण्यात आले. यापुर्वी राजारामबापू कारखान्यावरही आंदोलन झाले. मात्र तोडगा निघालेला नाही. तरीही वसंतदादा कारखान्यावर तोडगा निघाला आणि राजारामबापू कारखान्याबाबत तोडगा का निघाला नाही यामागे राजकीय गणित आहेत का अशी शंका येत आहे. आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला हस्तक्षेप निर्णायक ठरल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी कोंडी करण्याचा प्रयत्न तर अजितदादांच्याकडून सुरू नाही ना अशी शंका या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.
मागील हंगामातील गाळप उसाचे पैसे आणि चालू हंगामात एफआरपी अधिक १०० रूपये मिळावेत या मागणीसाठी कारखान्याचा हंगाम सुरू होण्याअगोदर पासून शेट्टी यांचे आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी मागणी मान्य करून हंगाम सुरू केला आहे. सांगलीतही हंगाम सुरू होउन महिना होत आला, तरी अद्याप दर जाहीर करण्यास कोणीही पुढे आले नाही. गेल्या आठवड्यात स्वाभिमानीने राजारामबापू कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये काटा बंद आंदोलन करून गव्हाणीत उड्या मारत कारखान्याचे गाळप थांबवले. मात्र, तोडगा निघाला नाही. दहा दिवसाची मुदत देउनही राजारामबापू कारखान्याने अद्याप दराचा निश्चित आकडा जाहीर न करता जास्तीत जास्त दर देण्याचे प्रयत्न केले जातील असे मोघम उत्तर देउन आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्ह्यात अन्य कारखाने सुरू असताना आमच्याच कारखान्यावर आंदोलन का असा सवाल आमदार पाटील यांनी सवाल उपस्थित करून शेट्टी यांच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसर्या टप्प्यात शेट्टी यांनी सांगलीच्या वसंतदादा कारखान्यावर आंदोलन करून या प्रयत्नाला शह देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा… पुणे जिल्ह्यात विकास कामांवरून आजी – माजी आमदारांमध्ये खडाजंगी
जिल्ह्यात १६ कारखाने सुरू असून यापैकी ११ कारखान्यांवर आमदार जयंत पाटील व विश्वजित कदम यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या हटवादी भूमिकेमुळेच ऊस दराची कोंडी केली जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी आंदोलनावेळी केला. सांगली व कोल्हापूरची भौगोलिक सलगता पाहता कोल्हापूरप्रमाणे सांगलीतील साखर कारखान्यांना दर देण्यास काहीच अडचण असण्याचे कारण नाही असा युक्तिवाद त्यांचा आहे. वसंतदादा कारखान्यावरील आंदोलन ३६ तास सुरू होते. चर्चेच्या दोन फेर्या झाल्या, तरी तोडगा निघणे दिसत असताना सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर कारखाना व्यवस्थापन हाती असलेल्या दत्त इंडियाने प्रतिटन ३१४१ रूपये देण्याचे मान्य केले. यामागे दादांचा शब्द महत्वाचा ठरला असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा… लाभार्थीचा वापर करून रावसाहेब दानवे यांची मतपेरणी
राजारामबापू कारखान्यावर आंदोलन सुरू असताना हस्तक्षेप झाला नाही, अजून उस दराचा प्रश्न अनिर्णित आहे. तरीही आमदार पाटील यांच्या कारखान्याबाबत हस्तक्षेप का झाला नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. वास्तविकता पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवरच राजकारण आजपर्यंत पोसले, वाढले, विस्तारले गेले. साखर कारखानदारीतून जसे साखर सम्राटांचे राजकारण पोसले तसेच उस दरावरून शेतकरी संघटनेचे राजकारणही पोसले. शेट्टी यांचे राजकारण प्रामुख्याने नदीकाठच्या उस पट्ट्यातच आहे. त्यांच्या राजकीय चळवळीची सुरूवातच मुळी शिरोळमधील दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेतून झाली. ऊस दरावरून त्यांचे आंदोलन बहरत गेले. याच जोरावर आमदारकी व खासदारकीही मिळाली. आता पुन्हा लोकसभेचे वेध लागले आहेत. यासाठी उसदराची नामी संधी आहे. वसंतदादा कारखान्यातील उस दराचा प्रश्न निकाली निघताच त्यांनी आपला मोर्चा आता शिराळा तालुक्यातील दालमिया शुगर्स या खासगी व्यवस्थापनाच्या कारखान्याकडे वळविला आहे. यामुळे पुढचा आठवडा स्वाभिमानीच्या लढ्याची धार शिराळा तालुका असणार आहे. विशेष म्हणजे शिराळा हातकणंगले लोकसभा मतदार संघात आहे.
हेही वाचा… हिंगोलीतील जातीय समीकरणातूनच राधेश्याम मोपलवारांचे नाव चर्चत
हातकणंगले लोकसभा मतदार संघातून आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांच्यासाठी पेरणी सुरू आहे. राष्ट्रवादीने इंडिया आघाडीतून जागेवर हक्क सांगितला आहे. मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी आमदार पाटील प्रयत्नशील तर आहेतच, पण आता नाही तर पुढे कधीच नाही अशी टोकाची स्थिती असल्याने उसदराचे श्रेय शेट्टींना मिळू नये यासाठीची कोंडी तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे. मात्र उपमुख्यमंत्री पवार यांनी या खेळीला सांगलीत शह देत आमदार पाटील यांची कोंडी करण्यासाठी दत्त इंडियाला पुढे करून एकीकडे शेट्टींना ताकद देत आमदार पाटील यांची कोंडी करण्याचे प्रयत्न तर केले नाहीत ना अशी चर्चा मात्र मतदार संघात सुरू आहे.