पुणे/बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक लढविणार की नाही, याबाबत साशंकता असताना येत्या सोमवारी (२८ ऑक्टोबर) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर अजित पवार यांचे पुतणे युगेेंद्र पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी केली असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे. त्यामुळे बारामतीत काका-पुतण्यामध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : महायुतीत नाराजीनाट्य कायम; जागावाटप रखडले; भाजपची दुसरी यादी गुरुवारपर्यंत

बारामतीतून अजित पवार लढणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत असताना त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता बारामती येथे मिरवणूक काढून ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ श्रीक्षेत्र कन्हेरी येथे दुपारी दोन वाजता होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे निरीक्षक सुरेश पालवे, तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे आणि निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी सांगितले.

दरम्यान, युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मालमत्तेवर थकबाकी नसल्याबाबतचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार यांनी मतदारसंघात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. स्वाभिमान यात्रा काढून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या पुण्यात मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी बारामतीसाठी कोणीही मुलाखत घेतली नाही. मात्र, आता युगेंद्र पवार हे उमेदवार असण्याची शक्यता असून, त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली आहे. त्यामुळे बारामतीत काका-पुतण्यांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar to file nomination from baramati assembly seat on october 28 print politics news zws