बुलढाणा : सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. यातून सावरत अजित पवार गटाने लगेच राजकीय डागडूजी सुरू केली आहे.आमदार शिंगणे यांच्यासोबत कमीत कमी पदाधिकारी व स्थानिक नेते जातील, याची दक्षता घेतली जात आहे. जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी शिंगणेच्या प्रवेशानंतर तातडीने पत्रकार परिषद घेत आपण आणि बहुसंख्य पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे जाहीर केले. यामागे आमदार शिंगणे यांचेच डावपेच असल्याच्या चर्चा आणि अफवा जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करून त्यांची खातरजमा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष काझी यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, सरचिटणीस गिरीधर ठाकरे, शंतनू बोन्द्रे यांच्यावर ही जवाबदारी देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंदखेड राजा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ असून पक्षाकडे अनेक पर्याय असल्याचे वरिष्ठ पक्षसूत्रांनी सांगितले. यामध्ये माजी आमदार शशिकांत खेडेकर (शिवसेना शिंदे गट) यांचे नाव अग्रस्थानी आहे. याशिवाय सुनील कायंदे (भाजप), संतोष खांदेभराड (राष्ट्रवादी), केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव (शिवसेना शिंदे गट), माजी जिल्हापरिषद सभापती अभय चव्हाण यांचा समावेश आहे. या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. सध्या अटीतटीवर आलेल्या गायत्री शिंगणे यांच्यावतीनेदेखील संपर्क करण्यात आल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांची दिल्लीदरबारी धाव, मित्रपक्षांना जागा सोडण्यास विरोध

महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून विधानसभा आणि संभाव्य उमेदवारासंदर्भातील अहवाल तातडीने मागवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार असून ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्यास तयार उमेदवारालाच संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सिंदखेड राजात अजितदादांनी स्वतः लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून शिंगणे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याचे नियोजन केले जात आहे.यानिमित्त आमदार शिंगणे यांचे सर्वपक्षीय विरोधक एकवटल्याचे चित्र आहे. माजी मंत्री शिंगणेंसमोर कडवे आवाहन उभे करून त्यांची कोंडी करण्याचे यामागे डावपेच आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar try to damage control search for a candidate equal to rajendra shingane print politics news amy