संतोष प्रधान
मुंबई : शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिल्याने राष्ट्रवादीतील अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. महिनाभरातच राष्ट्रवादीतील फुटीवर अध्यक्षांकडून निकाल अपेक्षित आहे.
शिवसेनेतील फुटीवरील निकालानंतर राष्ट्रवादीतील फुटीवर महिनाभरात निकाल देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना दिला आहे. शिवसेनेतील फुटीवरील सुनावणी पूर्ण होऊन निकालही जाहीर करण्यात आला. आता लगेचच राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटाने परस्परांचे आमदार अपात्र ठरिवण्यासाठी केलेल्या अर्जांवर अध्यक्षांकडे लगेचच सुनावणी सुरू होईल.
शिवसेनेतील फुटीवरील निकालात अध्यक्ष नार्वेकर यांनी पक्षाची सूत्रे कोणाकडे यावर निरीक्षण नोंदविताना विधिमंडळातील बहुमताचा आधार घेतला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधिमंडळात अजित पवार गटाचे बहुमत आहे. पक्षाचे ५३ पैकी ४० पेक्षा अधिक आमदार हे अजित पवार यांच्याबरोबर आहेत. यामुळ विधानसभेत अजित पवार गटाचे संख्याबळ अधिक आहे. शिवसेनेत पक्षादेशावरून प्रतोद कोण हा वाद झाला होता. सुनील प्रभू की भरत गोगावले यांच्यापैकी कोणाचा पक्षादेश कायदेशीर यावर काथ्याकूट झाला. राष्ट्रवादीत तसा वाद नाही. कारण राष्ट्रवादीच्या विधिमंडळ प्रतोदपदी अनिल पाटील आहेत. पक्षातील फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांना साथ दिली. यामुळे राष्ट्रवादीतील फुटीच्या सुनावणीत प्रतोदाचा मुद्दा वादग्रस्त ठरणार नाही.
शिवसेनेतील फुटीवरील सुनावणीत ठाकरे वा शिंदे गटाचे कोणीच आमदार अपात्र ठरले नाहीत. राष्ट्रवादीतील फुटीत शरद पवार किंवा अजित पवार गटाचे आमदार अपात्र ठरण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेतील फुटीत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागल्याने राष्ट्रवादीतील फुटीत अजित पवार यांच्या गटाच्या बाजूनेच निकाल लागेल, याबाबत अजितदादा गटाचे नेते आशावादी आहेत. शिवसेनेतील फुटीवरील निकालाने आम्ही निश्चिंत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका नेत्याने व्यक्त केली.