बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आज महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. मायावतींचा भाचा आकाश आनंद याची दुसऱ्यांदा पक्षाच्या महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आकाशचे लग्न माजी खासदार अशोक सिद्धार्थ यांच्या मुलीशी झाले. मायावती यांचा भाचा आकाश आनंद याची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून हकालपट्टी केली. आकाशच्या जागी त्यांनी त्यांचे धाकटे बंधू आनंद कुमार आणि राज्यसभा खासदार रामजी गौतम यांची नियुक्ती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाशसाठी असा धक्का बसण्याची ही दुसरी वेळ आहे. आकाशला २०१९मध्ये पहिल्यांदाच बसपाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नेमण्यात आले, त्यानंतर त्याला मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पदावरून हटवले गेले होते. निवडणुकांच्या आधी सीतापूर इथे शत्रुत्वाला प्रोत्साहन देणारे भाष्य केल्याने त्याला हटवले गेले होते. काही आठवड्यानंतरच त्याची पुन्हा नियुक्ती करण्यात आली.

आकाशचे सासरे माजी खासदार अशोक सिद्धार्थ यांची बसपातून हकालपट्टी करण्यात आली होती. “तुम्हाला माहीत आहे की अशोक सिद्धार्थ यांच्या मुलीचे आकाशशी लग्न झाले आहे. सिद्धार्थ यांनी त्यांच्या मुलीवर आणि आकाशवर किती प्रभाव टाकला आहे हे मला पाहावं लागेल. अशा परिस्थितीत आकाशला आम्ही सर्वपक्षीय जबाबदारीतून दूर केले आहे. आकाशची हकालपट्टी करण्याला तसंच त्याचं करिअर उद्ध्वस्त करत पक्षाचं नुकसान करण्यालाही अशोक सिद्धार्थच जबाबदार आहे” असं यावेळी मायावती यांनी सांगितलं. त्या लखनऊ इथल्या एका बैठकीनंतर बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी आकाशच्या जागी आनंद कुमार आणि राज्यसभा खासदार रामजी गौतम यांची नियुक्ती करणार असल्याचेही सांगितले.’मी जिवंत असेपर्यंत उत्तराधिकारी जाहीर करणार नाही’, असंही मायावती यांनी स्पष्ट केलं. “पक्ष सर्वोच्च आहे आणि नातेसंबंध त्यानंतर येतात”, असं मायावती म्हणाल्या गेल्याच महिन्यात बसपाने नेते नितीन सिंग यांचीही पक्षविरोधी कारवाया करत असल्याच्या आरोपाखाली हकालपट्टी केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील पक्षाच्या बैठकीत हा निर्णय आकाशला कळविण्यात आला होता. त्यानंतर लखनऊमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. त्यावेळी आकाश तिथे उपस्थित नव्हता.

१२ फेब्रुवारीला मायावती यांनी आकाश यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांनी बसपाची दोन गटांमध्ये विभागणी केली असा आरोप केला. आकाशची कारकीर्दही त्यांनीच उद्ध्वस्त केली असंही त्या म्हणाल्या. मायावती यांनी गेल्या महिन्यात गटबाजी आणि पक्षविरोधी कारवायांसाठी सिद्धार्थ यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. अशोक सिद्धार्थ यांनी आग्रा येथील कौटुंबिक सोहळ्याला अनेक ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रित केले नव्हते. तशी तक्रार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आल्यानंतर बसपा प्रमुखांनी कारवाई केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

आकाश याच्याविषयी माहिती देताना मायावती म्हणाल्या, “मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा उत्तराधिकारी घोषित करणार नाही आणि पक्षाचे कामकाज सांभाळत राहीन”. नव्या नियुक्तीनुसार आनंद कुमार हे दिल्लीतील कॅम्प पाहतील आणि रामजी गौतम हे देशभर पक्षाच्या समर्थकांशी संपर्क साधतील अशी माहिती मिळत आहे. पक्षाच्या हितासाठी आनंद कुमार त्यांच्या मुलांचे लग्न राजकीय घराण्यात करणार नसल्याचे मायावती म्हणाल्या.

आकाशला मायावतींनी पक्षाला उभारी देण्यासाठी म्हणून नियुक्त केले होते. मात्र दिल्ली, हरयाणा आणि २०२३च्या राजस्थानच्या निवडणुकीत पक्षाला फारसा बदल दिसला नाही. हरयाणात बसपाने ३५ जागा लढवल्या होत्या, मात्र त्यापैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. राजस्थानमध्ये १८४ जागांपैकी केवळ दोन जागांवर पक्षाला विजय मिळवता आला. २०१८नंतर अनेक आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मायावतींचा धाकटा भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आकाश आनंद. आकाशने त्याचे शालेय शिक्षण दिल्लीत तर लंडनमधून एमबीए पूर्ण केले. २०१७मध्ये आकाश भारतात परतल्यावर त्याने मायावतींसोबत काम करायला सुरूवात केली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर आकाशची प्रथमच बसपा राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.