बहुजन समाज पक्षातील नाराजी नाट्य आता संपुष्टात आलं आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं आहे. आकाश यांनी सोशल मीडियावर मायावतींची जाहीर मागितली आहे. त्याआधी त्यांनी कुटुंबातील सदस्य व पक्षाच्या इतर नेत्यांची माफी मागितली आणि त्यांना त्यांची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच पक्षात नवीन सुरुवात करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
मार्चमध्ये मायावतींनी आकाश यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून काढून टाकले. तसेच, त्यांना केवळ पक्षातूनच काढले नाही, तर राजकीय उत्तराधिकारी म्हणूनही वगळलं. आकाश यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली आल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. अशोक सिद्धार्थ हे राज्यसभा खासदार होते. त्यांना गटबाजी आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. ४१ दिवसांनंतर आकाश यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर काही तासांतच मायावतींनी त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. असं असताना ही संधी त्यांना एका अटीवर मिळाली आहे. आकाश यांना सर्व वरिष्ठांचा आदर करावा लागेल आणि त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली न येता काम करावं लागेल या अटीवर त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळाला आहे.
मायावतींचं म्हणणं काय?
“आकाशचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या चुका अक्षम्य आहेत. त्यांनी आकाशची कारकीर्द उद्ध्वस्त करण्यात आणि गटबाजी, पक्षविरोधी कारवाया करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे त्यांना माफ करीत पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही”, असे मायावती यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले, “आकाशचे वडील आनंद कुमार पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. आनंद कुमार यांनी आकाशला आणखी एक संधी द्यावी यासाठी मायावतींची मनधरणी केली. सगळे कुटुंबातील सदस्य आहेत. आकाश त्यांना पक्षातून बाहेर काढल्यानंतर भेटले की नाही हे माहीत नाही.”
अलीकडच्या काळात लखनऊमध्ये मायावतींना भेटायला आलेल्या अनेकांनी सांगितले की, “आकाश एक उच्चशिक्षित तरुण आणि चांगले वक्ते आहेत. त्यांच्या कामामुळे पक्षाला फायदा होऊ शकतो. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांची दिशाभूल केली असल्याचे म्हटले जात आहे”, असं लखनऊमधल्या एका वरिष्ठ बसपा पदाधिकाऱ्यानं सांगितलं.
आकाशची घरवापसी
आकाशची घरवापसी करण्याचा निर्णय रविवारीच झाला होता. मायावतींच्या कार्यालयातील पदाधिकाऱ्यांसह चर्चा केल्यानंतर आकाश यांनी त्यांचा माफीनामा प्रसिद्ध केला. आकाश यांच्या विधानानंतर काही मिनिटांतच, वरिष्ठ बसपा नेत्यांनी माफीनामा जाहीर केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आकाश यांना पहिल्यांदा बसपाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २०२४ च्या बसपाच्या लोकसभा मोहिमेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. असं असताना मे २०२४ मध्ये गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सीतापूर इथे प्रचारादरम्यान शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणामुळे आकाश यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून, तसेच राजकीय वारसदार म्हणून बेदखल करण्यात आले. ४७ दिवसांनंतर आकाश यांना दुसरी संधी देण्यात आली. जेव्हा मायावतींनी गेल्या जूनमध्ये त्यांना राष्ट्रीय समन्वयक आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पुन्हा नियुक्त केले. आता आकाश यांना दुसरी संधी देण्यात आली आहे.
मागच्या महिन्यात त्यांना समन्वयक पदावरून दुसऱ्यांदा काढून टाकण्यात आले होते. तसेच जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत उत्तराधिकारी निवडणार नाही, असं मायावतींनी त्यावेळी जाहीर केलं होतं. राष्ट्रीय समन्वयक पदाची विभागणी करीत राज्यसभा खासदार रामजी गौतम आणि ज्येष्ठ नेते रणधीर सिंग बेनीवाल यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. नवीन संघटनात्मक रचनेमुळे पक्षातील अंतर्गत लोकांना आकाश यांच्या पुढच्या भूमिकेबाबत स्पष्टता नाही. “आकाश यांच्या उपस्थितीमुळे निश्चितच पक्ष मजबूत होईल. त्यांची पुन्हा नियुक्ती झाल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आनंदी आहेत. मात्र, तो मायावतींच्या नेतृत्वाखाली एखाद्या पदावर असेल की सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करील हे स्पष्ट नाही”, असे दिल्लीतील एका बसपा नेत्यानं सांगितलं.
रविवारी आकाश यांनी माफी मागत मायावतींना आश्वासन दिलं की, ते राजकीय निर्णयांबाबत नातेवाईक किंवा इतर कोणाकडूनही सल्ले घेणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत आकाश यांनी मायावतींच्या उपस्थितीत दिल्लीतील एका नेत्यानं सेक्टर कमिटीजच्या स्थापनेबाबत सादर केलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी काही नेत्यांनी आकाश यांच्या त्या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.