भाजपा आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकार आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा” ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहिमेचा भाग म्हणून ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेशात साडेचार कोटी तिरंगे लावण्याची तयारी करण्यात येत आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांसह सर्व विरोधी पक्षांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी कन्नौज जिल्ह्यातील झौव्वा गावातून ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील प्रत्येक घरात राष्ट्रध्वज फडकवण्याची मोहीम सुरू केली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कारही केला.
उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्षांनीसुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्ष या मोहिमेत नुसताच सहभागी झाला नसून मोहिमेचा भाग म्हणून ते लोकांमध्ये राष्ट्रध्वजांचे वाटप देखील करणार आहेत. भाजपाप्रमाणेच सपाची मोहीम देखील आठवडाभराची आहे. त्यांनी ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगाने ९ ऑगस्टपासून मोहीम सूर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एका सपा नेत्याने सांगितले की पक्ष दरवर्षी ऑगस्ट क्रांती दिवस साजरा करतो. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केले होते. त्या निमित्ताने पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या घरांवर आणि पक्ष कार्यालयांवर तिरंगा फडकावला. यावेळी पक्षाने ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आठवडाभर तिरंगा मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे.
बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी मंगळवारी देशातील जनतेला भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. देशभक्ती दाखवण्यासाठी तिरंगा मोहीम हाती घेण्यात सपा भाजपाचे अनुकरण करत आहे का असे विचारले असता पक्षाचे प्रवक्ते अब्दुल हफीज गांधी म्हणाले “कोणत्याही विशिष्ट पक्षाचा देशभक्तीवर कॉपीराइट नाही. देशाबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचे हे विशेष पर्व असल्याने सपाने आठवडाभराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रध्वज फडकावण्याचे आवाहन करून लोकांपर्यंत पोहोचतील.” सपाच्या या मोहिमेचा आणि राजकारणाचा संबंध नाही आणि तो जोडू नये असेही गांधी म्हणाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसपीने ३१ जुलै रोजी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हा युनिट्सना तिरंगा मोहिमेबद्दल एक संदेश पाठवला होता. यामध्ये त्यांना तिरंगा मोहिमेत सक्रिय सहभागी होण्यास सांगण्यात आले होते.