समाजवादी पार्टीने आपली मध्य प्रदेशची कार्यकारिणी विसर्जित केली. पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीनंतर मध्य प्रदेशच्या समाजवादी पार्टीमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर आता संपूर्ण कार्यकारिणीच विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीदरम्यान काँग्रेस-समाजवादी पार्टी यांच्यात वाद

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान जागावाटपावरून काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. अखिलेश यादव काँग्रेसवर उघडपणे टीका करत होते. मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या टिप्पणींमुळे हा वाद जास्तच चिघळला होता. त्याचाच परिणाम म्हणून या दोन्ही पक्षांतील जागावाटपाची चर्चा फिसकटली होती. त्यानंतर मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला खास कामगिरी करता आली नाही.

७२ जागांवर उमेदवार, सर्व पराभूत

समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशमध्ये एकूण २३० जागांपैकी ७२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यातील एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता आलेला नाही. या निवडणुकीत खुद्द अखिलेश यादव तसेच त्यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांनीदेखील प्रत्यक्ष मैदानात उतरून लोकांशी संपर्क साधला होता. ठिकठिकाणी सभा घेत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. समाजवादी पार्टीला फक्त ०.४३ टक्के मते मिळाली.

निर्णयाचे नेत्यांकडून स्वागत

अखिलेश यादव यांनी घेतलेल्या या निर्णयाचे मध्य प्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या बहुसंख्य नेत्यांनी स्वागत केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरेजेच आहे, असे मत या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आले.

“पक्षाने चुकीच्या लोकांना तिकिटं दिली”

समाजवादी पार्टीचे भोपाळमधील नेते शामशूल हसन यांनी मध्य प्रदेश कार्यकारिणीच्या विसर्जनावर प्रतिक्रिया दिली. “मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने अत्यंत चुकीच्या लोकांना तिकीट दिले. त्यामुळे सध्या संघटनात्मक पातळीवर बदल करणे गरजेचे होते. या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या काही नेत्यांनी भाजपाशी छुपी युती केली होती. काही उमेदवारांनी मुद्दामहून चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे आगामी काळातील लोकसभा निवडणुकीपूर्वी चांगल्या आणि नव्या लोकांची कार्यकारिणीवर नियुक्ती करणे गरजेचे आहे,” असे हसन म्हणाले.

“आमची चर्चा सुरू होती, पण…”

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या जागावाटपावरही हसन यांनी भाष्य केले. “मलनाथ यांनी अखिलेश यादव यांच्याविरोधात केलेल्या वक्त्यव्यामुळे समाजवादी पार्टीचे नेते रागावलेले होते. मात्र प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर आम्ही चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळू शकलो असतो. जागावाटपाच्या चर्चेत मीदेखील सहभागी होतो. तीन जागांसाठी आमची चर्चा सुरू होती. मात्र ही चर्चा फलदायी ठरली नाही,” असे मत हसन यांनी व्यक्त केले.

अखिलेश यादव नव्या नेत्यांना संधी देणार का?

दरम्यान, अखिलेश यादव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील कार्यकारिणी विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता कोणकोणत्या नेत्यांना संधी दिली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अखिलेश यादव नव्या आणि तरुण नेत्यांना वेगवेगळी पदे देऊन पक्षात नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न करणार की जुन्या नेत्यांनाच पुन्हा संधी देऊन पक्षाला बळकट करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav dissolve samajwadi party madhya pradesh unit ahead of loksabha election 2024 prd