उत्तर प्रदेशच्या राजकारणात दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांची मते निवडणूक जिंकण्यासाठी महत्त्वाची मानली जातात. बहुजन समाज पक्ष अनेक वर्षांपासून या मतदानावर निवडणूक जिंकत आला. आता मात्र समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी दलित मतदारांना आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. समाजवादी पक्षाकडून मागच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्यांची पुनरावृत्ती अखिलेश यादव यांना पुन्हा करायची नाही. यासाठीच बसपासोबत निवडणूक न लढविता थेट बसपाच्या मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सपाने सुरू केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सपाने बसपाची साथ सोडली होती.
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च रोजी समाजवादी पक्षाने लखनऊ येथील मुख्यालयात जयंतीसोहळा आयोजित केला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम, माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्या आणि इतर नेत्यांनी एकत्र येऊन दिवंगत कांशीराम यांना अभिवादन केले. तसेच उत्तर प्रदेशच्या दलित चळवळीत आणि सामाजिक सुधारणांमध्ये त्यांचे योगदान कसे मोलाचे होते, यावर भाषणे केली. यासोबतच सपाने प्रत्येक जिल्ह्यात ‘मान्यवर कांशीराम जयंती समारोह’ हे अभियान राबवून जयंती साजरी केली.
अखिलेश यादव यांनी १२ मार्च रोजी पक्षाच्या बैठकीत बसपा नेत्या मायावती यांच्यावर जोरदार टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी यांनी दाखविलेल्या मार्गावरून बसपा पक्ष भरकटला असून तो आता भाजपाची बी टीम बनला आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी या बैठकीत केली होती. यानंतर सपाकडून १५ मार्च रोजी कांशीराम यांच्या जयंती उत्सवाचे जोरदार आयोजन करण्यात आले. १४ एप्रिल रोजी येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सपाने अनेक कार्यक्रमांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंबेडकर जयंती साजरी करणार आहे. सपाच्या नेत्याने सांगितले की, पक्षाकडून पूर्ण आठवडाभर जयंतीचे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. भाजपाकडून संविधानाला धोका आहे, संविधानाचे रक्षण करण्यासाठी सपा हा एकमेव पक्ष प्रयत्नशील आहे, असा संदेश या माध्यमातून दलित समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
समाजवादी पक्षाची कोलकाता येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दलित समाजातील पासी जातीचे नेते, सपाचे ज्येष्ठ पदाधिकारी अवधेश प्रसाद यांना अखिलेश यादव यांनी आपल्या बाजूला मंचावर बसविले होते. कोलकाता येथे बैठकीला जाण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी आपले काका शिवपाल सिंह यादव आणि अवधेश प्रसाद यांच्यासोबत सेल्फी काढून तो ट्विटरवर पोस्ट केला होता.
अवधेश प्रसाद हे अयोध्या जिल्ह्यातील मिल्किपूर विधानसभा मतदारसंघातून नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. माजी मंत्री राहिलेले प्रसाद पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. प्रसाद यांना चौथ्यांदा राष्ट्रीय सरचिटणीसपदी नेमण्यात आले आहे. मात्र या वर्षात त्यांना नेहमीपेक्षा वेगळा सन्मान मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या व्यासपीठावर त्यांना जागा देण्यात येत आहे. मायावती यांच्याबाबत बोलताना अवधेश प्रसाद म्हणाले की, कांशीरामजी यांनी दलितांच्या उत्थानासाठी जो मार्ग दाखविला त्यापासून मायावती आता भरकटल्या आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाकडे दलित वर्ग आशेने पाहत आहे. समाजवादी पक्षाकडे दलितांचा ओढा वाढत आहे.
कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत समाजवादी पक्षाने ‘समाजवादी बाबासाहेब आंबेडकर वाहिनी’ हा विभाग पक्षाच्या घटनेत अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला. २०२२ च्या निवडणुकीआधी २०२१ साली वाहिनीची स्थापना करण्यात आली होती. दलितांना पक्षाशी जोडून घेण्यासाठी ही वाहिनी काम करत आहे. वाहिनीच्या अध्यक्षपदी मिठाई लाल भारती यांना नियुक्त करण्यात आले होते. मिठाई लाल भारती यांनी सांगितले की, वाहिनीचा पक्षाच्या घटनेत अंतर्भाव केल्यामुळे आता निवडणूक आयोगालादेखील याची माहिती मिळेल. तसेच लवकरच राष्ट्रीय पातळीपासून ते बुथ स्तरापर्यंत वाहिनीच्या संघटनेची रचना करण्यात येईल.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पक्षाने याआधीदेखील साजरी केलेली आहे. पण या वेळी आम्ही राज्यपातळीवर मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करत आहोत. कांशीरामजी यांची जयंती साजरी करण्याबाबत चौधरी म्हणाले की, एकेकाळी सपा आणि कांशीरामजी एकत्र होते. नेताजी मुलायम सिंह यांच्या पाठिंब्यावर १९९१ साली कांशीराम एटावा (Etawah) लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मागच्या काही वर्षांत पक्षातील नेते वैयक्तिक पातळीवर कांशीराम यांची जयंती साजरी करत होते. मात्र या वेळी आम्ही पक्षाच्या मुख्यालयातच जयंती कार्यक्रम आयोजित केला होता.