Srikant Jena Congress Controversy : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे राजकीय डावपेचांत मोठे पटाईत मानले जातात. अखिलेश यादव यांनी नुकताच ओडिशाचा दौरा केला, यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत कुमार जेना यांची भुवनेश्वरमध्ये भेट घेतली. राज्यातील विविध मुद्द्यांवर तासभर चर्चा केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, ज्यामुळे काँग्रेसमधील अनेक जण अस्वस्थ झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेना यांचे राजकीय स्थान आणि प्रतिष्ठा लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस समिती राज्यातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

श्रीकांत जेना काँग्रेसमध्ये नाराज?

काँग्रेसने फेब्रुवारीमध्ये प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी भक्त चरण दास यांची निवड केली. त्यानंतर श्रीकांत कुमार जेना हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. पक्षातील नेते आपल्याला जाणून बुजून बाजूला सारत असल्याची तक्रारही माजी केंद्रीय मंत्री जेना यांनी केली होती. मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, असंही ते म्हणाले होते. आता अखिलेश यादव यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेमुळे काँग्रेस नेते जेना यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.

जेना आणि अखिलेश यादव यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे काँग्रेसमधील नेत्यांना अस्वस्थ करीत असल्याचा दावा पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत कौतुक केल्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे. “श्रीकांत कुमार जेना यांच्यासारखे लोक एकत्र आले तर सामाजिक न्यायाची लढाई एकत्रितपणे लढता येईल,” असे अखिलेश यादव या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

आणखी वाचा : Murshidabad Violence : युसूफ पठाणवर का होतेय टीका? पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर काय घडलं?

श्रीकांत जेना समाजवादी पार्टीत प्रवेश करणार?

समाजवादी पार्टीच्या अध्यक्षांनी कौतुक केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा ओडिशाच्या राजकारणात सुरू झाल्या. मात्र, मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, असं श्रीकांत कुमार जेना यांनी स्पष्ट केलं आहे. “मी अखिलेशजींच्या कुटुंबाला ओळखतो, कारण त्यांचे वडील (मुलायमसिंह यादव) आणि मी एकाच सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होतो. अखिलेशजी त्यांच्या कुटुंबाबरोबर पुरी येथे दर्शनासाठी आले होते, त्यामुळे भुवनेश्वरमध्ये मी त्यांची भेट घेतली. आम्ही इंडिया आघाडीत एकत्र काम करत आहोत. आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं जेना यांनी माध्यमांना सांगितलं.

ओडिशात काँग्रेसची स्थिती बिकट

ओडिशात काँग्रेसला चांगलीच घरघर लागली असून राज्यात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काँग्रेस हायकमांडचे प्रयत्न आहेत. त्याचवेळी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने अखिलेश यादव यांची भेट घेतल्याने पक्षातील नेते व पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “श्रीकांत जेना आणि अखिलेश यादव यांच्या भेटीवर आम्हाला आक्षेप असण्याचं कारण नाही. मात्र, दोन्ही नेते खासगीत भेटू शकत होते, त्यांना एकत्रित पत्रकार परिषद घेण्याची काय गरज होती? अशा गोष्टींमुळे पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.”

‘काँग्रेसने जेना यांची मनधरणी करावी’

दिल्लीतील काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते म्हणाले, “श्रीकांत जेना हे ओडिशामधील महत्त्वाचं नाव आहे आणि त्यांना गमावणे पक्षाला परवडणारे नाही. आम्ही त्यांच्याशी या भेटीबाबत चर्चा करू आणि त्यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करू.” राज्यातील काँग्रेसमधील एका नेत्याने सांगितलं, “पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने जेना यांना त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसं पद द्यावं, अशी त्यांची इच्छा आहे. ते एक महत्त्वाचे नेते असून त्यांना पक्षात टिकवून ठेवणं गरजेचं आहे. श्रीकांत जेना यांना पक्षाने अखिल भारतीय काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी द्यायला हवी, अन्यथा ते समाजवादी पार्टीत प्रवेश करू शकतात.”

ओडिशात समाजवादी पार्टीची ताकद वाढणार?

“समाजवादी पार्टी हा इंडिया आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष आहे, पण प्रत्येक जण स्वतःच्या फायद्यासाठी काम करतो. जर अखिलेश यादव यांना असं वाटत असेल की जेना यांना पक्षात घेऊन ओडिशामध्ये त्यांना फायदा होईल, तर ते नक्कीच तो प्रयत्न करतील,” असंही काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं. दरम्यान, समाजवादी पार्टीतील सूत्रांनुसार, ओडिशामधील काही वरिष्ठ नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न आहे. बीजेडीचे (बीजू जनता दल) काही नेतेही त्यांच्या संपर्कात आहेत. समाजवादी पक्षाला त्यांची ओडिशातील ताकद वाढवायची आहे, म्हणूनच अखिलेश यादव हे राज्यात आपली पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ओडिशात काँग्रेसकडे किती आमदारांचं संख्याबळ?

काँग्रेस पक्ष ओडिशाच्या राजकारणात हळूहळू कोपऱ्यात ढकलला जात असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे बीजू जनता दलातही अंतर्गत धुसफूस होत असल्याची चर्चा आहे. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वावरही पक्षातील नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. काँग्रेसची जवळपास ४० वर्ष ओडिशावर एकहाती सत्ता होती. मात्र, आता राज्यात पक्षाची ताकद सातत्याने कमी होत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी १६.१२ टक्के होती. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत या टक्केवारीत झपाट्याने घट झाली. सध्या काँग्रेसकडे ओडिशात १४ आमदारांचं संख्याबळ आहे.

हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या ‘त्या’ विधानाचा भारताने कसा समाचार घेतला?

भाजपाला पराभूत करण्यासाठी ‘सपा’ची रणनीती

भाजपा सध्या ओडिशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. समाजवादी पार्टीच्या एका नेत्याने सांगितलं, “जनतेने यावेळी भाजपाला सत्तेवर आणलं असलं तरी त्यांचा पराभव करणं फारसं अवघड नाही, म्हणूनच आमच्या पक्षाने राज्यातील संघटन आणि जनाधार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.” दरम्यान, श्रीकांत जेना हे ओडिशातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मानले जातात. २०१९ मध्ये पक्षाने त्यांचे निलंबन केलं होतं. मात्र, मार्च २०२४ मध्ये जेना यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ओडिशात काँग्रेसला मोठा धक्का बसणार?

गेल्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बालासोरमधून जेना यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपाचे उमेदवार प्रताप चंद्र सारंगी यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, अखिलेश यादव यांनी श्रीकांत जेना यांची भेट घेतल्यामुळे ओडिशात सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत. असं झाल्यास ओडिशात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे काँग्रेस हायकमांड श्रीकांत जेना यांची कशाप्रकारे मनधरणी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.