समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची कर्नाटकमधील सिद्धरामय्या-शिवकुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थिती चटकन लक्षात येणारी होती. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि राजकीय पक्षांचे नेते बंगळुरू येथे शपथविधीनिमित्त जमले होते. या शपथविधी सोहळ्यातून विरोधकांची एकजूट असल्याचे चित्र दाखविण्यात आले. समाजवादी पक्षाने गेल्या काही काळापासून काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काँग्रेसने फक्त निवडक जागांवरच लढावे, अशी भूमिका मांडली होती. समाजवादी पक्षाला या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते, तरीही ते गैरहजर राहिले. तर समाजवादी पक्षाशी आघाडी करणाऱ्या राष्ट्रीय लोक दल पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार जयंत चौधरी यांनी मात्र सोहळ्याला हजेरी लावली.
अखिलेश यादव यांच्या गैरहजेरीबाबत प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाने सांगितले की, यादव यांच्या गोरखपूर आणि बलिया येथे आधीच काही बैठका ठरल्यामुळे त्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. अखिलेश यादव शनिवारी गोरखपूरचा दौरा करणार होते. माजी मंत्री आणि पूर्व यूपीमधील मातब्बर नेते हरिशंकर तिवारी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी ते गोरखपूरमध्ये जाणार होते. त्यासोबतच समाजवादी पक्षाच्या माजी आमदार शारदा देवी यांची भेट घेण्यासाठी बलियाचा दौरा करणार होते. तसेच बलियामधील समाजवादी पक्षाचे नेते अरविंद गिरी यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते, त्यांचेही सांत्वन अखिलेश यादव करणार होते. मात्र, अखिलेश यादव यांच्या आत्याचे निधन झाल्यामुळे त्यांनी अचानक शनिवारच्या भेटी पुढे ढकलून त्यांचे मूळ गाव सैफई येथे धाव घेतली.
कर्नाटक काँग्रेसने अखिलेश यादव यांना निमंत्रण दिले होते. त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून फोन आला होता. पण गोरखपूर आणि बलियाचा नियोजित दौरा असल्यामुळे त्यांना कर्नाटकला जाता आले नाही. शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहण्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही, अशी माहिती समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी दिली.
चौधरी पुढे म्हणाले की, अखिलेश यादव यांनी सिद्धरामय्या यांना पत्राद्वारे शुभेच्छा संदेश पाठविला आहे.
मात्र समाजवादी पक्षाच्या दुसऱ्या एका नेत्याने सांगितले, “अखिलेश यादव यांनी जाणूनबुजून या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. कारण समाजवादी आणि काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होण्याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. काँग्रेस पक्षाने २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०२२ ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक समाजवादी पक्षाच्या विरोधात जाऊन लढवली होती, हे आम्ही कसे विसरायचे? काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून कोणताही संवाद झालेला नाही. सध्या समाजवादी पक्ष हा काँग्रेस आणि भाजपाच्या विरोधात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या मंचावर एकत्र येणे, हे बरोबर दिसणार नाही.”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ च्या अनुभवानंतर अखिलेश यादव राजकीय आघाडी करण्याबाबत चाणाक्ष झाले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या खासदारांची संख्या पाच एवढीच राहिली. २०१४ मध्येदेखील त्यांचे पाच खासदार होते. बसपाला मात्र दहा जागांचा लाभ झाला. तेच २०१४ साली बसपाचा एकही खासदार निवडून आला नव्हता.
मागच्याच महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेतली होती. त्यानंतर अखिलेश यादव यांनी लखनऊ येथे सांगितले की, नितीश कुमार हे जास्तीत जास्त विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून २०२४ साली भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल. भाजपापासून देशाची लोकशाही, संविधान आणि हा देशच वाचविण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे.
दरम्यान नितीश कुमार यांनी कर्नाटकमधील शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली, तर ममता बॅनर्जी यांनी स्वतः उपस्थित न राहता पक्षातील इतर नेत्याला सोहळ्यासाठी पाठविले.
मार्च महिन्यात राष्ट्रीय आघाडीबाबत बोलत असताना अखिलेश यादव म्हणाले होते की, भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना पाठिंबा द्यावा. अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात भाजपाशी दोन हात करत आहेत. जे जे पक्ष देशभर भाजपाच्या विरोधात लढत आहेत, त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वतःची भूमिका काय आहे? हे ठरवावे. ज्या ज्या ठिकाणी इतर पक्ष बळकट आहेत, त्यांना काँग्रेसने तिथे पाठिंबा द्यावा. आता वेळ आली आहे की, काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या पाठीशी उभे राहून प्रादेशिक पक्षांना भाजपाचा पराभव करण्यासाठी पुढे केले पाहिजे.
यासोबतच अखिलेश यांनी काँग्रेसच्या पारंपरिक अमेठीमधून पुढील निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची घोषणा केलेली आहे. आजवर समाजवादी पक्षाकडून या मतदारसंघात उमेदवार दिला जात नव्हता.