आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी देशभरातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपासह अन्य पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २०२४ साली होणारी ही निवडणूक आम्हीच जिंकू असा दावा भाजपाकडून केला जात आहे. याच दाव्यावर बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाष्य केले आहे. भाजपा पक्ष आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील सर्व जागांवर पराभूत होऊ शकतो, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.
“आगामी काही दशकं आम्ही देशावर राज्य करू असा दावा भाजपाकडून केला जातो. पुढील ५० वर्षे आम्हीच सत्तेत असू असे भाजपाचे नेते म्हणत आहेत. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी एकदा उत्तर प्रदेशमधील दोन वैद्यकीय महाविद्यालयांना भेट द्यावी. मग त्यांना कळेल की येथे त्यांचा किती जागांवर विजय होऊ शकतो. कदाचित भाजपाचा यावेळी उत्तरप्रदेशमधील सर्व ८० जागांवर पराभव होऊ शकतो,” असे अखिलेश यादव म्हणाले.
हेही वाचा >>> “काँग्रेसला संंपवण्यासाठी नरेंद्र मोदी- ममता बॅनर्जींनी..,” काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप
उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीवरूनही यादव यांनी भाजपाला लक्ष्य केले. “आम्ही लंडन, न्यूयॉर्क येथून राज्यात गुंतवणूक आणत आहोत, असा दावा त्यांच्याकडून केला जात होता. मात्र आता ते राज्यातीलच वेगवेगळ्या जिल्ह्यातून गुंतवणूक आणत आहेत. ते कोणाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.