गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीत जागावाटपावरून धुसफूस चालू आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आम्ही आगामी लोकसभेची निवडणूक एकट्याने लढवणार आहोत, असे जाहीर केले आहे. तसेच या पक्षाने काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासही नकार दिला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीदेखील आम्हाला या यात्रेचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही, असे सांगितले. अखिलेश यादव यांच्या याच स्पष्टीकरणावर काँग्रेसने आता प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच आम्ही आमच्या यात्रेचे वेळापत्रक ठरवू आणि त्यानंतर हे वेळापत्रक इंडिया आघाडीतील इतर पक्षांना दिले जाईल, असे जयराम रमेश यांनी सांगितले.
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचे अखिलेश यादवांना आमंत्रण नाही? उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय?
जयराम रमेश काय म्हणाले?
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी अखिलेश यादव यांच्या स्पष्टीकरणावर भाष्य केले. “भारत जोडो न्याय यात्रेचे उत्तर प्रदेशमधील वेळापत्रक तयार केले जात आहे. या वेळापत्रकाला येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम स्वरुप मिळणार आहे. त्यानंतर हे वेळापत्रक इंडिया आघाडीतील घटकपक्षांना दिले जाईल. अखिलेश यादव भारत जोड यात्रेत सहभागी झाल्यास इंडिया आघाडीला अधिक बळ येईल. ही यात्रा १६ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे,” असे जयराम रमेश यांनी सांगितले होते.
अखिलेश यादव काय म्हणाले होते?
भारत जोडो न्याय यात्रेत इंडिया आघाडीतील घटकपक्षांनीही सहभागी व्हावे, असे काँग्रेसकडून आवाहन केले जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. यावरच अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली. “अडचण अशी आहे की, अनेक मोठ्या कार्यक्रमांत आम्हाला आमंत्रित केले जात नाही. बोलावण्यात आलेले नसताना आम्ही स्वत:च आमंत्रणासाठी विचारणा करावी का?” असा प्रश्न अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींच्या यात्रेवर प्रशांत किशोर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, “ही सर्वांत वाईट…”
ममता बॅनर्जींचे ‘एकला चलो रे’
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा अगोदर पश्चिम बंगालमध्ये गेली होती. त्यानंतर या यात्रेने बिहारमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा एकदा ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये गेली आहे. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्ही आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असून आमची इंडिया आघाडीशी जागावाटपावर चर्चा सुरू नाही, असे सांगितले आहे. तृणमूल काँग्रेसच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. या भूमिकेनंतर ममता बॅनर्जींनी आम्ही भारत जोडो न्याय यात्रेतही सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, बॅनर्जी यांनी आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत, असे सांगितले असले तरी तृणमूल काँग्रेस हा अद्याप इंडिया आघाडीचाच भाग आहे.
समाजवादीने जारी केली १६ उमेदवारांची यादी
दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू आहे. मात्र या दोन्ही पक्षांत यावर तोडगा निघालेला आहे. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण १६ उमेदवारांची नावे आहेत. समाजवादी पार्टीच्या या भूमिकेनंतर उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसची अडचण झाली आहे.
पहिल्या यादीत १६ उमेदवार, डिंपल यादव यांना उमेदवारी
समाजवादी पार्टीने आपल्या पहिल्या यादीत एकूण १६ जागांसाठी उमेदवार दिले आहेत. या पहिल्याच यादीत समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या पत्नी तथा खासदार डिंपल यादव यांनाही तिकीट देण्यात आले आहे. त्या मैनपुरी या आपल्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवतील. मैनपुरी हा मतदारसंघ यादव घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. याच जागेवरून अखिलेश यादव यांचे वडील तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी निवडणूक लढवलेली आहे. कित्येक वर्षे मुलायमसिंह यादव यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आता याच मतदारसंघातून डिंपल यादव खासदार असून त्या पुन्हा एकदा याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत.