मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी (सपा) या दोन पक्षांत चांगलाच वाद निर्माण झाला आहे. सपा या पक्षाला मध्य प्रदेशमध्ये जनाधार नाही. त्यामुळे या पक्षाने तेथे निवडणूक न लढवता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केले होते; तर समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी राय यांच्यावर चिरकूट म्हणत टीका केली होती. या दोन्ही पक्षांतील जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर यादव हे उघडपणे काँग्रेसवर टीका करू लागले. त्यानंतर या दोन्ही पक्षांतील वाद वाढला होता. मात्र, आता अखिलेश यांचा सूर काहीसा नरमला आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याचा मला संदेश आला आहे, त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.
“काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याकडून संदेश आला”
गेल्या काही दिवसांपासून अखिलेश यादव काँग्रेसवर टीका करत होते. या टीकेमुळे विरोधकांच्या इंडिया या आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र, आता समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा मला संदेश आला असून आम्ही त्यांचे ऐकत आहोत, असे यादव यांनी सांगितले आहे. “नुकतेच मला काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याकडून संदेश आला आहे. हे सर्वोच्च नेते काही सांगत असतील तर ते ऐकावे लागेल. माझ्याशी चर्चा झालेले नेते हे पहिल्या क्रमांकाचे आहेत,” असे अखिलेश यादव यांनी सांगितले. ते हरदोई येथे माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरं देत होते.
“त्या प्रसंगात आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता”
“डॉ. राम मनोहर लोहिया आणि मुलायमसिंह यादव यांनी काँग्रेसच्या मदतीबाबत याआधी भाष्य केलेले आहे. काँग्रेसची स्थिती बिकट असेल तेव्हा, तसेच आमची गरज असेल तेव्हा ते आमच्याकडे येतील. अशा स्थितीत आम्ही त्यांची मदत करू, असे मुलायमसिंह यादव आणि राम मनोहर लोहिया म्हणाले होते. आमच्या याच संस्कृतीचे आम्ही पालन करू. भारत जेव्हा अमेरिकेशी अणूकरार करत होता, तेव्हा काँग्रेसला आमच्या पाठिंब्याची गरज होती. त्या प्रसंगातही आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता”, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले.
“काँग्रेसने आमच्या विरोधात कट रचू नये”
काँग्रेसने मध्य प्रदेशच्या बाबतीत त्यांचे धोरण काय आहे? याबाबत आधीच स्पष्टीकरण द्यायला हवे होते, असेही यादव म्हणाले. “मध्य प्रदेशमध्ये युती करायची नव्हती, तर त्यांनी मला कॉल का केला होता? विरोधकांची इंडिया आघाडी ही फक्त लोकसभेच्या निवडणुकीसाठी आहे, राज्यपातळीवर ही आघाडी नाही, असे आम्हाला काँग्रेसने सांगायला हवे होते. याचे काँग्रेसकडे कोणतेही उत्तर नाही. त्यांनी आमच्या विरोधात कट रचू नये. त्यांनी आमची फसवणूक करू नये,” असे अखिलेश यादव म्हणाले.
“मतांसाठीच काँग्रेसचा जातीआधारित जनगणनेला पाठिंबा “
अखिलेश यादव हे काँग्रेसच्या बाबतीत सध्या नरमाईची भूमिका घेत आहेत. मात्र, हरदोई येथे बोलताना काही तासांआधीच त्यांनी जातीनिहाय जनगणनेविषयी बोलताना काँग्रेसवर टीका केली होती. “काँग्रेसने मतांसाठीच जातीआधारित जनगणनेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसला दलित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत. काँग्रेसने याआधी जातीआधारित जनगणनेची आकडेवारी जाहीर केली नव्हती. त्यांनी ही जनगणना होऊ दिली नव्हती. आता मतांची गरज असल्यामुळे त्यांनी भूमिका बदलली आहे, हे आश्चर्यकारक आहे”, असे अखिलेश यादव म्हणाले होते.
“युती कायम राखण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची”
अखिलेश यांच्या या विधानांवर अजय राय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अखिलेश यादव काँग्रेसच्या कोणत्या सर्वोच्च नेत्याबद्दल बोलत आहेत, याची मला कल्पना नाही. युती कायम राखण्याची जबाबदारी ही काँग्रेस आणि समाजवादी पार्टी अशा दोघांचीही आहे. आम्ही अद्याप कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही. प्रश्न माझा नसून मी ज्या पदावर आहे, त्या पदाचा आहे,” असे अजय राय म्हणाले.
वादामुळे आघाडीच्या घटकपक्षांत अस्वस्थता
दरम्यान, अखिलेश यादव यांनी काँग्रेसप्रती सध्या मवाळ धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी समाजवादी पार्टीने २५ पेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या दोन्ही पक्षांतील वादामुळे इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा वाद लवकरात लवकर मिटवावा. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीने यात हस्तक्षेप करावा, अशी भूमिका आघाडीच्या घटकपक्षांतील काही नेत्यांनी घेतली होती.