Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका दोन वर्षांनंतर आहेत. मात्र, या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आतापासून जोरदार तयारीला लागले आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासून मोठी योजना आखली आहे. तसेच निवडणुकीसाठी आपलं सोशल इंजिनिअरिंग मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. २०२४ च्या निवडणुकीतील पीडीए (मागास, दलित, अल्पसंख्याक) फॉर्म्युल्याच्या पार्श्वभूमीवर आता सपा २०२७ ची लढाई जिंकण्याची रणनीती बनवत आहे. तसेच अखिलेश यादव यांच्या पीडीए फॉर्म्युल्याला तोंड देण्यासाठी भाजपाही पीडीए समीकरणासाठी योजना आखण्याची शक्यता आहे. भाजपाने यूपीमध्ये विविध मतदारसंघाच्या स्थानिक स्तरावर बूथ आणि मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीत दलित आणि मागासवर्गीयांना स्थान दिलं आहे. यावरून स्पष्ट होतं की, २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपानेही आपलं सोशल इंजिनिअरिंग मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.
समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये मागास, दलित आणि अल्पसंख्याक समुदायांशी संपर्क वाढवण्यासाठी महिनाभराचा ‘पीडीए चर्चा’ अशी मोहीम सुरु केली आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत विशेषत: दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजवादी पार्टीने आपली ‘पीडीए’ (पिछड़ा, दलित, अल्पसंख्यक) मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविध मतदारसंघातील मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच विविध मतदारसंघात पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये भाजपा संविधान बदलणार, तसेच अमित शाह यांनी संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावरून सपाच्या नेत्यांकडून भाजपावर हल्लाबोल केला जात आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय?
दरम्यान, समाजवादी पार्टीने २६ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशमध्ये ही मोहीम सुरु केली आहे. मात्र, सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितलं की, काही दिवस थंडीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे. आता २७ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, सपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थंड हवामान आणि रब्बी हंगामामुळे पक्षाला विशेषतः ग्रामीण भागात लोकांना संघटित करण्यात अडचण येत आहे. पीडीए (मागास, दलित, अल्पसंख्याक) हा फॉर्म्युला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुरु केला. मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक मतं आपल्याकडे वळण्यासाठी अखिलेश यादव यांनी ही रणनीती आखली. पीडीएच्या मुद्द्याने लोकसभा निवडणुकीत सपाला मोठं यश मिळालं. सपाने ८० पैकी ३७ जागा मिळवून सत्ताधारी भाजपाला धूळ चारली, तर इंडिया आघाडीतील काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. भाजपाला ३३ जागा मिळाल्या.
या ‘पीडीए’च्या चर्चेच्या मोहिमेत समाजवादी पार्टीतील सर्वच नेते भाषण करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करतील आणि संविधान वाचवा यासह आदी मुद्यांवर भर देतील. अखिलेश यांनी या मोहिमेचे प्लॅनिंग केल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितलं. समाजवादी पार्टीने या मोहिमेसाठी संबंधित कार्यक्रमांना संबोधित करण्यासाठी आपले नेते आणि पदाधिकारी, आमदार आणि खासदारांसह निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि त्याच्या शाखा आणि आघाडीच्या संघटनांचे पदाधिकारी मैदानात उतरवले आहे. कानपूरमध्येही दोन विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जातनिहाय जनगणना आणि आरक्षणासारख्या इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली. तसेच समाजवादी पार्टी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी विचारांसाठी काम करत असल्याचंही नेत्यांनी म्हटलं. दरम्यान या संपूर्ण मोहिमेत समाजवादी पक्षाच्या नेत्यांकडून भाजपाच्या विरोधात टिका केली जात आहे.