समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपावर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून खोचक टीका केली आहे. “जो पक्ष स्वत:ला जगातला सर्वात मोठा पक्ष मानतो, त्यांना आपला राष्ट्रीय अध्यक्ष अद्याप निवडता आलेला नाही”, असं वक्तव्य अखिलेश यांनी लोकसभेत केलं.

यावर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनीदेखील अखिलेश यांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर टीका करत त्यांच्यावर कुटुंबाचा अजेंडा पुढे नेल्याचा आरोप केला. भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. यावर अखिलेश यांना उत्तर देताना अमित शाह यांनी म्हटले की, “इथे जेवढे पक्ष आहेत, त्यांना केवळ पाच जणांना एकत्र येत त्यांच्या त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष निश्चित करायचे आहेत. मात्र, आमच्या पक्षात १२ ते १३ कोटी सदस्यांमधून एकाची निवड करायची असते, त्यासाठी वेळ तर लागणारच.”

शाह यांनी पुढे मोठ्या मजेशीर पद्धतीने अखिलेश यादव यांना उत्तर दिले. “तुमच्याबाबतीत फार वेळ लागणार नाही. मला तर वाटतं की तुम्ही पुढची २५ वर्षे पक्षाचे अध्यक्ष असाल.” शाह यांच्या या उत्तरावर अखिलेश यादव हसताना दिसले.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कधी…

दरम्यान, सत्ताधारी भाजपाच्या अध्यक्षपदाची निवड करण्याची प्रक्रिया गेल्या १० महिन्यांपासून प्रलंबित आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनानंतर ही प्रक्रिया पुन्हा हाती घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत भाजपा त्यांच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. जानेवारी २०२० मध्ये नड्डा यांची एकमताने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. भाजपा अध्यक्षांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा आहे. असं असतानाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला होता.

अखिलेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याबाबतही भाष्य केलं. “नुकतीच जी नागपूरची यात्रा पार पडली, ती पुढच्या ७५ वर्षांच्या एक्स्टेंशनची यात्रा तर नाही ना”, असंही अखिलेश यादव यांनी खोचकपणे म्हटले. अखिलेश यांनी भाजपाबाबत बोलताना टीकांचा भडिमार सुरू केल्यानंतर अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मध्यस्थी करत तुम्ही वक्फच्या मुद्द्यावर बोला, असा इशारा यादव यांना केला.
वक्फ दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा होत असताना अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली. “वक्फ विधेयक, मुस्लीम समुदायाबाबत निर्णय घेतला जात आहे. मात्र, या समुदायाची सहमतीच घेतली जात नाही. धर्माचं परिवर्तन व्यवसायात करू नका, असं वक्तव्य यावेळी अखिलेश यांनी केलं.”