राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी अमेठीत दाखल झाली. मात्र, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या यात्रेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत काँग्रेस जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होणार नसल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय समाजवादी पक्षाने आणखी ११ जागांसाठी उमेदवारही जाहीर केले. त्यामुळे इंडिया आघाडीत जागावाटपावरून असलेले मतभेद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अखिलेश यादव?

अखिलेश यादव यांनी सोमवारी सकाळी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करीत राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. तसेच जोपर्यंत काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील जागावाटप निश्चित होत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे अखिलेश यादव यांच्या या घोषणेनंतर काही तासांतच समाजवादी पक्षाकडून आणखी ११ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. यापूर्वी समाजवादी पक्षाने १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे समाजवादी पक्षाने आतापर्यंत एकूण २७ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Mallikarjun kharge nashik rally
“महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

हेही वाचा – भाजपा प्रवेशाची चर्चा; कमलनाथ यांना धुरंधर राजकारणी का म्हटले जाते?

अखिलेश यादवांकडून काँग्रेसला दिल्या होत्या शुभेच्छा!

विशेष म्हणजे या घोषणेच्या १५ दिवसांपूर्वीच अखिलेश यादव यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत, अमेठी किंवा रायबरेली येथे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्यांनी या यात्रेसाठी काँग्रेसला शुभेच्छाही दिल्या होत्या.

जागावाटपाबाबत काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न?

सोमवारी लखनौमध्ये माध्यमांशी बोलताना अखिलेश यादव यांनी त्यासंदर्भात प्रतिक्रियाही दिली. ”इंडिया आघाडीतील घटक पक्षांबरोबर जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. तसेच उमेदवारांच्या याद्यांची अदलाबदलही झाली आहे. ज्यावेळी हे जागावाटप निश्चित होईल, तेव्हा समाजवादी पक्ष भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होईल”, असे ते म्हणाले. त्यामुळे अखिलेश यादव यांच्याकडून जागावाटपाबाबत काँग्रेसवर दबाव आणला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राहुल गांधींची यात्रा अमेठीत

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी अमेठीत दाखल झाली. यावेळी त्यांनी बाबूगंज येथे एका जाहीर सभेलाही संबोधित केले. त्यानंतर आज सकाळी (मंगळवारी) ही यात्रा शेजारीच असलेल्या रायबरेलीच्या दिशेने निघाली.

अखिलेश यादवांच्या निर्णयावर काँग्रेसचीही प्रतिक्रिया

अखिलेश यादव यांच्या निर्णयानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी प्रतिक्रिया दिली. “सध्याच्या परिस्थितीत जागावाटपापेक्षा लोकशाहीचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी समाजवादी पक्षासह प्रत्येकाला मोठे मन दाखवावे लागेल”, असे ते म्हणाले. तसेच अखिलेश यादव या यात्रेत सहभागी होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – दोन वर्षांनंतर राहुल गांधी आणि स्मृती इराणी एकाच वेळी अमेठीत; लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापणार?

अमेठी आणि रायबरेली काँग्रेससाठी महत्त्वाचे

उत्तर प्रदेशचे राजकारण बघता, अमेठी आणि रायबरेलीत काँग्रेसला समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. कारण- गेल्या काही दशकांत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या खराब प्रदर्शनानंतरही काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीत विजय मिळवला होता. अमेठीत १९९९ मध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसविरोधात शेवटचा उमेदवार दिला होता. या निवडणुकीत समाजवादी पक्षाने कमरुज्जमा फौजी यांनी उमेदवारी दिली; मात्र सोनिया गांधी यांनी त्यांचा पराभव केला होता.

२००४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवली होती. यावेळी समाजवादी पक्षाने राहुल गांधींविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी रायबरेलीत सोनिया गांधींविरोधात उमेदवार दिला. या निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांचाही विजय झाला. पुढे २००९ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागांवर उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे दोघांनाही या जागा सहज जिंकता आल्या.

२०१९ च्या निवडणुकीतही समाजवादी पक्षाने अमेठी आणि रायबरेलीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून विजय मिळवला; तर स्मृती इराणी यांनी अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव केला. दरम्यान, आता सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी राज्यसभेसाठी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रायबरेलीची जागा खाली झाली आहे. या ठिकाणी आता प्रियंका गांधी या निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.