अकोला : विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात भाजपने निर्विवाद आपले वर्चस्व कायम राखले आहे. तीन जागांवर कमळ फुलले, तर ‘अकोला पश्चिम’चा भाजपचा बालेकिल्ला बंडखोरीमुळे ढासळला. त्याचा फायदा काँग्रेसला झाला असून तब्बल दोन दशकानंतर जिल्ह्यात पंजाला संधी मिळाली. तिरंगी लढतीत बाळापूरची जागा शिवसेना ठाकरे गटाने राखली. एक जागा गमवावी लागली तरी पाचपैकी तीन जागा मोठ्या फरकांनी जिंकत भाजपने दबदबा कायम ठेवला आहे.
अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती झाल्या. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी हॅटट्रिक साधत ५० हजार ६१३ मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवला. अकोला पूर्व आता भाजपचा नवा बालेकिल्ला म्हणून समोर आला असून विक्रमी मताधिक्य मिळवत आमदार रणधीर सावरकर यांनी नवा इतिहास रचला. कोट्यवधींची विकास कामे, पक्षाचे मजबूत जाळे व तळागाळातील जनसंपर्क सावरकरांसाठी जमेची बाजू ठरली. पक्षांतर्गत त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे अकोला पूर्वसह अकोट व मूर्तिजापूरची जागा निवडून आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
हेही वाचा – प्रस्थापितांची शेती पडीत ठेवून मतदारांनी कमळ शेती फुलविली, भाजपच्या पदरात भरभरून मतदान
तब्बल २९ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या भाजपला अकोला पश्चिममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी भाजपच्या विजय अग्रवालांचा अवघ्या एक हजार २८३ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात भाजपतील हरीश आलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे यांनी बंडखोरी केली होती. त्याचा मोठा फटका भाजपला बसला असून पक्षाला ३० वर्षांनंतर पराभवाचे तोंड बघावे लागले. शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा यांची बंडखोरी देखील काँग्रेसच्या पथ्यावर पडली. अकोला पश्चिममध्ये काँग्रेसला बंडखोरी थोपवण्यात यश आले होते, तर भाजप त्यात कमी पडले. बंडखोरीमुळे झालेल्या मतविभाजनातून भाजपला निसटता पराभव स्वीकारावा लागला. जिल्ह्यात बाळापूर मतदारसंघात १९९९ मध्ये काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे निवडून आले होते. त्यानंतर २००४ पासून कोरी पाटी असलेल्या काँग्रेसला तब्बल दोन दशकांनंतर जिल्ह्यात अकोला पश्चिममध्ये यश मिळाले. या मतदारसंघात ३० वर्षानंतर मतदारांनी पंजाला संधी दिली.
अकोट मतदारसंघात भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी हॅटट्रिक पूर्ण केली. या मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये थेट सामना झाला. त्यात १८ हजार ८५१ मतांनी भारसाकळेंनी विजय मिळवला. अकोट मतदारसंघात जातीय समीकरण महत्त्वपूर्ण होते. ते भाजपच्या पथ्यावर पडले. मराठा समाजाचे मतविभाजन टळल्यामुळे भारसाकळे यांना फायदा झाला. काँग्रेसचे ॲड. महेश गणगणे यांनी चांगली लढत दिली. काँग्रेसच्या जनाधारात वाढ झाल्याचे दिसून येत असून ॲड. गणगणे यांना ७४ हजार ४८७ मते मिळाली.
हेही वाचा – महाविकास आघाडी एकत्र लढल्याशिवाय राज्यसभा, विधान परिषदेत प्रतिनिधित्व कठीण
वंचितला उमेदवारीवरून अंतर्गत नाराजीचा फटका बसला आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे यांनी विजयाचा चौकार लगावला. जातीय व मतविभाजनाचे समीकरण भाजपच्या दृष्टीने अनुकूल होते. निकालात त्यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी शरद पवार गट व वंचितच्या उमेदवारांमध्ये दलितांच्या मतांचे विभाजन झाले. त्याचा थेट फायदा भाजपचे पिंपळे यांना झाला. ३५ हजार ८६४ मतांनी मोठा विजय मिळवत हरीश पिंपळेंनी मतदारसंघातील वर्चस्व कायम ठेवले.
बाळापूर मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांनी कायम राखला. शिवसेना उबाठा व वंचितचे खतिब यांच्यात लढत झाली. महायुतीत शिवसेना शिंदे गट बाळापूरमध्ये लढला. मात्र, ऐनवेळी भाजपतून आयात बळीराम सिरस्कार यांना रिंगणात उतरवले होते. निवडणुकीत ते तिसऱ्यास्थानी घसरल्याने पक्षावर नामुष्की ओढवली. महायुतीतील अंतर्गत नाराजी व कुरबुरी देखील चर्चेत होती. त्याचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला झाला.