अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढतीत भाजपचा फायदा होतो हे आतापर्यंत गेल्या २० वर्षांत अनुभवास आले. यंदाही तिरंगी लढत होत असून, महाविकास आघाडीला हूल देणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर स्वबळावर विजय प्राप्त करू शकतता की भाजपला पुन्हा तिरंगी लढतीचा फायदा होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला मतदारसंघात नेहमीच जातीय राजकारण व मतविभाजनावर विजयाचे समीकरण ठरते. ॲड. प्रकाश आंबेडकर १९८४ पासून येथून सातत्याने लढत असल्याने कायम तिरंगी लढत होते. केवळ १९९८ व १९९९ ची निवडणूक अपवाद ठरली असून काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे ॲड. आंबेडकरांनी या दोनवेळा लोकसभा गाठली होती. तिहेरी लढती नेहमीच भाजपच्या पथ्यावर पडल्याचा आजवरचा इतिहास आहे. २०१४ व २०१९ मध्ये काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार दिल्याने निवडणुकीला धार्मिक रंग चढले होते. त्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व कायम ठेवले. आता राजकीय समीकरणात मोठा फेरबदल झाला. अकोला लोकसभेच्या सारीपाटावर नवा खेळ मांडण्यात आला आहे. सलग २० वर्षे प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणावरून सक्रिय राजकारणापासून दूर असल्याने भाजपने त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांना संधी दिली. ॲड. प्रकाश आंबेडकर सलग अकराव्यांदा अकोल्यातून आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांच्या रुपाने मराठा उमेदवार देऊन विरोधकांना शह देण्याची खेळी खेळली. या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होत आहे.

हेही वाचा – काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप

दोन दशकांपासून भाजपकडे खासदारकी असल्याने अनुप धोत्रे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला समोरे जात आहेत. मतदारसंघातील रखडलेली विकास कामे, प्रलंबित प्रश्न प्रचारात केंद्रस्थानी आले. पक्षांतर्गत खदखद व परिवारवादावरून अनुप धोत्रेंवर टीका होत असली तरी संघटनेवरील पकड, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे, नरेंद्र मोदींचा चेहरा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. काँग्रेसचे उच्चशिक्षित डॉ. अभय पाटील यांचा नवा चेहरा असून ते संवाद बैठकांमधून आपला कार्यक्रम मतदारांपुढे मांडत आहे. ‘मविआ’ला एकसंघ ठेवण्यासह गठ्ठा मते वाढविण्यावर त्यांचा भर दिसून येतो. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पुन्हा एकदा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग राबविण्याकडे कल दिसून येतो. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना पाडण्यासाठीच मुस्लीम उमेदवार दिल्याचा आराेप वंचितकडून १० वर्षांत वारंवार झाला. यंदा मतांच्या ध्रुवीकरणाचा लाभ होणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. उमेदवारांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात भेटीगाठी घेऊन मतजोडणी करण्यावर सर्वाधिक भर दिला. राजकीय प्रयोगाचे केंद्र असलेल्या अकोला मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जातीय समीकरण जुळवण्याचे लक्ष्य

अकोला मतदारसंघात मराठा मतदारांचे प्राबल्य आहे. दोन प्रमुख उमेदवार याच समाजातून येतात, तर ॲड. आंबेडकर देखील मराठा समाजाच्या मतपेढीवर लक्ष ठेऊन आहेत. परिणामी, मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणे अटळ आहे. मतदारसंघात ओबीसी, मुस्लीम, दलित, माळी, धनगर, आदिवासी, बंजारा आदी मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे. या समाजांची गठ्ठा मते कुणाकडे वळतात, हे विजयाचे समीकरण जुळून येण्यासाठी महत्त्वपूर्ण राहील.

हेही वाचा – केरळमधील ‘व्हायरल’ टीचर अम्मा आहे तरी कोण? काय आहे कम्युनिस्ट पक्षाची रणनीति?

मतांच्या बेरीज-वजाबाकीवर विजयाचे गणित

गत निवडणुकीत संजय धो़त्रेंनी विक्रमी मताधिक्य घेत दोन लाख ७५ हजार ५९६ मतांनी आंबेडकरांचा पराभव केला होता. धोत्रेंना पाच लाख ५४ हजार ४४४, वंचितला दोन लाख ७८ हजार ८४८, तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे हिदायत पटेलांना दोन लाख ५४ हजार ३७० मतांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीतील मतदान कायम राखण्याची कसरत भाजपला करावी लागत आहे, तर वंचित व काँग्रेसपुढे सुमारे दीडलाख मतदान वाढविण्याचे आव्हान आहे. मतांच्या बेरीज-वजाबाकीच्या गणितात कोण यशस्वी होतो, यावरून राजकीय आडाखे बांधले जात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola lok sabha who benefits from the three way fight between prakash ambedkar bjp congress print politics news ssb
Show comments