चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष गटातटात विखुरलेला आहे. काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींमध्ये अंतर्गत वितुष्ट आहे. मात्र, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांच्या सत्कारासाठी काँग्रेसची सर्व नेतेमंडळी एकत्र आली. राजुऱ्यातील सत्कार सोहळ्यात माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार. सुभाष धोटे, आमदार ॲड. अभिजित वंजारी एकाच मंचावर आले होते. स्थानिक स्वराज्य संस्था तथा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही असेच ‘एकीचे बळ’ दिसल्यास काँग्रेसचा विजय निश्चित आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.
हेही वाचा- रायगडात भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली, शेकापचा बडा नेताही वाटेवर
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती प्रकरणावरून तर आमदार वडेट्टीवार विरुद्ध खासदार धानोरकर असा संघर्ष सुरू आहे. याच प्रकरणावरून राजुराचे आमदार सुभाष धोटे हे देखील नाराज आहेत. एकमेकांविरुद्ध नाराजी बाळगून असलेल्या काँग्रेसच्या या नेत्यांना शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी एकत्रित आणले. विशेष म्हणजे, अडबाले यांच्या विजयायासाठी वडेट्टीवार, धानोरकर, धोटे, वंजारी व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यासह दुसऱ्या फळीतील सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. यामुळे अडबालेंचा विजय सुकर झाला. अडबालेंच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेस नेत्यांनी ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानाची जणू जिल्ह्यात सुरुवात केली. यावेळी आ. वडेट्टीवार आणि खा. धानोरकर यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केली, तर आ. वंजारी यांनी एकीच्या बळाबाबत भाष्य केले. आ. धोटे यांनी काँग्रेस एकसंघ असल्याचा संदेश दिला. हे पाहून आ. अडबाले यांनीही वडेट्टीवार, धानोरकर आणि वंजारी यांचे तोंड भरून कौतुक केले.
हेही वाचा- एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात राजकीय पाठबळ; ठाकरे गट, राष्ट्रवादीला धक्का
जिल्ह्यातील काँग्रेस नेते एकाच व्यासपीठावर आले असले तरी महिला काँग्रेस मात्र दुभंगलेलीच आहे. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या महिला नेत्यांनाही एकत्र आणून पक्षाला उभारी देण्याचे काम करावे लागणार आहे.