DYNASTS : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सध्या राज्यात निवडणुकीची धामधूम आहे. दिवाळी ३ नोव्हेंबरला संपते आहे. त्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे. सध्याच्या घडीला महायुती असो किंवा महाविकास आघाडी सगळ्यांच्याच उमेदवार याद्या आल्या आहेत. या याद्यांमध्ये घराणेशाही दिसून येते आहे. सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीला महत्त्व दिलं आहे हे या याद्या सांगत आहेत. महाविकास आघाडीतले तीन घटक पक्ष म्हणजेच काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) , राष्ट्रवादी (शरद पवार) असोत किंवा महायुतीले तीन पक्ष असोत म्हणजेच भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) अशा तीन सत्ताधारी पक्षांनीही ज्या जागा वाटल्या त्यात घराणेशाही ( DYNASTS ) दिसून येते आहे.

महाराष्ट्रातलं जागावाटप कसं झालं आहे?

महायुतीने २८८ जागांपैकी भाजपा १५२ जागांवर निवडणूक लढवते आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ७८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ५२ जणांना तिकिट दिलं आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेस लढवतं आहे. म्हणजेच १०४ जागांवर कांग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना ९६ जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ८७ जागांवर निवडणूक लढवते आहे. या याद्यांची खासियत अशी आहे की अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांमध्ये राजकारणात दोन घटना घडल्या. एक घटना शिवसेना फुटणं होती तर दुसरी घटना राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे निश्चित मानलं जात होतं. उमेदवार याद्यांमध्ये तेच पाहण्यास मिळालं. भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तीन पक्षांनी प्रत्येकी किमान नऊ घराणेशाहीचे उमेदवार आहेत. तर शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी अनुक्रमे आठ, पाच, आणि एक अशा ठिकाणी घराणेशाहीतले ( DYNASTS ) उमेदवार दिलेत.

भाजपात घराणेशाहीचे उमेदवार कोण?

भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुलीला म्हणजेच श्रीजया चव्हाण ( DYNASTS ) यांना तिकिट दिलं आहे. भोकर मतदारसंघातून त्यांना तिकिट देण्यात आलं आहे. पुण्यातल्या चिंचवड येथील जागेवरुन भाजपाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाला म्हणजेच शकंर जगताप ( DYNASTS ) यांना तिकिट दिलं आहे. तसंच रावेर या ठिकाणी हरिभाऊ जावळेंचा मुलगा अमोल जावळे यांना भाजपाने तिकिट दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या मतदारसंघात बाबूराव पाचपुतेंच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना तिकिट दिलं आहे. तर मालाड या ठिकाणाहून आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार यांना भाजपाने तिकिट दिलं आहे. तर प्रकाश आवाडेंचे पुत्र राहुल आवाडे यांना इचलकरंजीतून तिकिट देण्यात आलं आहे. कल्याण पूर्वेतून भाजपाने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकिट दिलं आहे. कारंजा या मतदारसंघात दिवंगत प्रकाश डहाकेंच्या पत्नी सई डहाकेंना ( DYNASTS ) लातूरमधून भाजपाने तिकिट दिलं आहे. तर अर्चना पाटील चाकूरकर यांना ही भाजपाने तिकिट दिलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाही अंतर्गत कुणाला तिकिट?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नवोदित उमेदवारांना अनेक संधी देण्यात आल्या आहेत. फलटणमध्ये संदिपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंना उमेदवारी ( DYNASTS ) देण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्वमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना तिकिट दिलं आहे. राजापूर या ठिकाणाहून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तिकिट देण्यात आलं आहे. माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्या मुलाला म्हणजेच अभिजित अडसुळ यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दर्यापूरमधून तिकिट दिलं आहे. खानापूर या मतदारसंघातून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर ( DYNASTS ) यांना शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. अनिल बाबर यांचं या वर्षी जानेवारी महिन्यात निधन झालं. त्यानंतर हा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. एरंडोलमधून चिमणराव पाटील यांच्या मुलाला म्हणजेच अमोल पाटील यांना तिकिट देण्यात आलं आहे. भाजपाचे निलेश राणे हे एकनाथ शिंदेंच्या पक्षात आले आहेत. निलेश राणे ( DYNASTS ) हे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे सुपुत्र आहेत. त्यांनाही एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून तिकिट दिलं आहे. रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनाही कन्नडमधून एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातली घराणेशाही

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अणुशक्तीनगरमधून नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक ( DYNASTS ) यांना उमेदवारी दिली आहे. तर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून लढत आहेत.

काँग्रेसमध्ये घराणेशाही कशी दिसून येते?

काँग्रेसने रावेरचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचा मुलगा धनंजय चौधरींना तिकिट दिलं आहे. तर सावनेरमध्ये सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना पक्षाने तिकिट दिलं आहे. प्रतिभा धानोरकर यांचे बंंधू प्रवीण काकडे यांना चंद्रपूरच्या वरोरामधून काँग्रेसने तिकिट दिलं आहे. तर यवतमाळमधून काँग्रेसने शिवाजीराव मोघेंचा मुलगा जितेंद्र यांना तिकिट दिलं आहे. भास्कर पाटील यांच्या सुनेला म्हणजेच मीनल पाटील यांना काँग्रेसने नांदेडमधल्या नायगावमधून तिकिट दिलं आहे. तर दिवंगत भरत भालकेंच्या मुलाला म्हणजेच भगीरथ भालकेंना पंढरपूरमधून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. करवीर मतदारसंघातून पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल पाटील ( DYNASTS ) यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. शाहू महाराज छत्रपती यांच्या सुनेला काँग्रेसने कोल्हापूर उत्तरमधून तिकिट दिलं आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड ( DYNASTS ) यांना धारावी मतदारसंघातून काँग्रेसने तिकिट दिलं आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार यादीत घराणेशाही कशी आणि कुठे?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जे उमेदवार दिलेत त्यातही घराणेशाहीची झलक पाहण्यास मिळाली आहेच. वरुण सरदेसाई ( DYNASTS ) यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी देण्यात आली आहे. वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरेंचे भाचे आहेत. कोपरी पाचपखाडी मतदारसंघातून आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना उद्धव सेनेने तिकिट दिलं आहे. केदार दिघे हे दिवंगत नेते आनंद दिघेंचे पुतणे आहेत. तर मालेगाव बाह्य मतदारसंघातून उद्धव सेनेने अद्वय हिरेंना तिकिट दिलं आहे. अद्वय हिरे माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र आहेत. दिवंगत नेते आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी ( DYNASTS ) यांना पाचोरा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तिकिट दिलं आहे. माणिकराव जगताप यांच्या पत्नी स्नेहल जगताप ( DYNASTS ) या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात आल्या ज्यानंतर त्यांना मालाड पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातही घराणेशाहीची झलक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार यादीतही घराणेशाही दिसतेच. बारामतीत शरद पवारांनी त्यांचा नातू युगेंद्र पवार ( DYNASTS ) यांना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांची लढत त्यांचे काका आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरमधून तिकिट दिलं आहे. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील ( DYNASTS ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पारनेर मतदारसंघातून निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंना उमेदवारी देण्यात आली आहे. वाशिममधल्या करंजा मतदारसंघातून ज्ञायक पाटणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तिकिट दिलं आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काटोलमधून उमेदवारी दिली आहे. तर उल्हासनगरमधून माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमी कलानी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर वर्ध्यात अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांना आर्वी मतदारसंघातून तिकिट देण्यात आलं आहे.