पिंपरी शहरात चार आमदार आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आयारामांमुळे निष्ठावंतांची कोंडी होत असल्याने माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, रवि लांडगे यांनी पक्षाला रामराम केला असताना स्थानिक नेत्यांमध्ये पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. मनमानी कारभारामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असून कारवाईची मागणी भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवडमधील भाजपमध्ये नवा-जुना वाद सातत्याने सुरू असतो. शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती झाल्यापासून भाजपमध्ये गटबाजी धूमसत आहे. जगताप यांच्या निवडीने नाराज झालेल्या माजी नगरसेवकांचा एक गट कधीच त्यांच्यासोबत दिसत नाही. दुसरीकडे भोसरीतील पक्षाच्या कार्यक्रमाच्या कोणत्याही फलकांवर शहराध्यक्षांचे छायाचित्रे वापरले जात नाही. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्यावर पक्षाअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी पक्षाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली. यावरुन भाजपमध्ये समन्वय नसल्याची कबुली शहराध्यक्षांनी दिली होती. त्यातच भाजपचे निष्ठावान घराणे असलेल्या दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे माजी नगरसेवक रवि यांनी पक्षाला रामराम ठोकला.

हेही वाचा >>>समरजितसिंह घाटगे यांची भूमिका उद्या ठरणार

रवि लांडगे यांना पक्षाकडून कोणत्याही प्रकारची संधी मिळाली नाही. शहरातील पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढविण्याऐवजी पक्षफुटीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवला. त्यामुळे स्थानिक नेत्यांवर कारवाई करावी. जेणेकरून पक्षातून बाहेर पडून कोणीही इतर पक्षांमध्ये जाणार नाही. अन्यथा भाजपला लागलेली गळती विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा ठरेल, असे थोरात यांनी पत्रात म्हटले आहे.

भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी संधी नसल्याने आणि विधान परिषदेवर संधी नाकारण्यात आल्याने नाराज होऊन माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनीही पक्षाला सोडचिट्टी दिली. निष्ठावान नेते पक्ष सोडून जात असल्याने पुन्हा पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. त्यातून शहराध्यक्षांसह पक्षांच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला जात आहे.

हेही वाचा >>>राजकारण सोडणार नाही, नवा पक्ष काढणार – चंपाई सोरेन

भाजपमध्ये आयारामांची गर्दी झाली असून अनेकांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. त्या पदांचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर सुरू आहे. त्यातून अंतर्गत गटबाजी वाढून पक्षामध्ये दुही निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कोंडी होत आहे.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष प्रवेश होत आहेत. त्यासाठी शहराध्यक्ष, आमदारांना जबाबदार धरता येणार नाही. अमोल थोरात यांना कार्यकारिणीत स्थान दिले नसल्याने वैयक्तिक आकसातून ते कारवाईची मागणी करत आहेत.-सचिन काळभोर,चिटणीस, भाजप

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All is not well among the local leaders in pimpri chinchwad city bjp print politics news amy